Breaking News

कुलूप तोडून घरातून लाखो रुपयांचा ऐवज लंपास


पुणे, दि. 2, मे - भर दिवसा घराचे कुलूप तोडून घरातून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. ही चोरी कृष्णानगर भागात सकाळी 9 ते दुपारी 12 दरम्यान झाली. दरम्यान याच तीन तासात अन्य तीन घरांमध्ये चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.मुकेश जगदीश वाईकर (वय 38, रा. फ्लॅट नं. 40, सेक्टर नं. 20, कृष्णानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश एका खाजगी कंपनीत एच आर पदावर काम करतात. त्यांच्या पत्नी सुवर्णा कृष्णानगर मधील एस. डी. गणगे प्रशालेत शिक्षिका आहेत. दोघेही नोकरीसाठी सकाळी नऊ वाजण्यापूर्वी घराबाहेर पडले. शाळेच्या मधल्या सुट्टीत दुपारी 12 वाजता सुवर्णा घरी आल्या असता, त्यांना फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी तात्काळ मुकेश यांना याबाबत माहिती दिली. मुकेश कंपनीमधून घरी आले. त्यांनी आतमध्ये पहिले असता बेडरूममधील तिजोरीत ठेवलेले 60 हजार रुपये किमतीच्या 4 तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, 10 हजार रुपये किमतीचे 7 ग्रॅम वजनाचा सोन्याचा झुमका आणि रोख रक्कम 40 हजार रुपये असा एकूण एक लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचे निदर्शनास आले.