Breaking News

आतापर्यंत दोनशे बिटकॉईन जप्त


पुणे, दि. 2, मे - बिटकॉईन या आभासी चलनात चांगल्या परताव्याच्या आमिषाने हजारो नागरिकांची कोट्यवधींना फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांची ‘खोदा पहाट निकला चुहा’ अशीच अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्य आरोपींसह तब्बल बारा जणांना अटक केल्यानंतर आतापर्यंत 210 बिटकॉईन जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यातही तक्रारदारांची संख्या हजारावर असताना केवळ 70 जणांनीच पोलिसांकडे धाव घेतली आहे. 

आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याने तपासात गती मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. शभरात धुमाकूळ घालणा-या बिटकॉईनचा पहिला गुन्हा पुण्यात दाखल झाला. त्यानंतर पुणे पोलिसांनी जंगजंग पछाडून अमित भारतद्वाज आणि त्याचा भाऊ विवेककुमार भारद्वाज या दोघांना बँकॉक येथून अटक केली. या दोघांकडून मोठे घबाड बाहेर पडेल, अशी अपेक्षा पोलिसांना होती. मात्र, भारद्वाजचे झालेले किडनी ट्रान्सप्लांट, इतर आजार या वैद्यकीय कारणांसह परदेशात असलेली माहिती यामुळे तपासामध्ये अनेक अडचणी येत आहेत. भारद्वाज आणि त्याच्या साथीदारांकडूनही पोलिसांना सहकार्य केले जात नाही. भारद्वाजचे दोन साथीदार ओमप्रकाश बागला (वय 28) आणि निकुंज वीरेंद्रकुमार जैन (रा. नवी दिल्ली) यांना अटक केली. त्यांच्याकडून प्रत्येकी 32.501 आणि 125.552 एवढे बिटकॉईन जप्त केले आहेत.