Breaking News

डॉ. मिर्झा बनल्या 'मिसेस इंडिया क्विन! 'फेस ऑफ थे वेस्ट' चा मिळाला बहुमान


संगमनेर : संगमनेरसारख्या ग्रामीण भागात राहून मुलांसह कुटुंबाची काळजी आणि वैद्यकीय व्यवसाय ठेवत येथील डॉ. फरिदा मिर्झा यांनी 'फेस ऑफ थे वेस्ट' चा बहुमान पटकाविला. नवीदिल्ली येथे झालेल्या मिसेस इंडिया क्विन आॅफ सबस्टेन्स या विवाहित महिलांच्या सौंदर्य स्पर्धेत त्या 'मिसेस इंडिया क्विन’ बनल्या. देशपातळीवरील या स्पर्धेत ४९ महिलांना मागे टाकीत त्यांनी हा किताब मिळवला.
देशभरातून मिसेस इंडिया क्वीन आॅफ सबस्टेन्स या स्पर्धेत लाखो महिलांनी आपली नामांकने दाखल केली होती. स्पर्धेच्या व्यासपीठावर पोहोचणे आणि ही स्पर्धा जिंकून दाखविणे, हे डॉ. मिर्झा यांच्यासाठी मोठे आव्हान होते. सौंदर्यासोबतच बुद्धिमत्ता आणि नम्रता या गुणांच्या बळावर त्यांना हे आव्हान पेलता आले. स्पर्धेत एकीकडे देशातील अनेक मोठ्या शहरांतून महिला स्पर्धेत यात सहभागी झाल्या होत्या. मात्र, संगमनेर सारख्या ग्रामीण भागातून त्यांनी नवीदिल्ली येथे जाऊन स्पर्धेत मिळविलेल्या यशाचा त्यांच्या पतीला आणि मुलांना अभिमान आहे. त्यांचे पती डॉ. अब्रार मिर्झा हे सुध्दा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. रुग्णांना सेवा देण्याचे कार्य मिर्झा दांपत्य एक दशकाहून अधिक काळापासून करीत आहेत. दरम्यान, डॉ. मिर्झा यांच्या या यशाचे कौतुक समाजातील सर्वच क्षेत्रातून होत आहे.