Breaking News

पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार जाहीर


पुणे, दि. 08, मे - विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड यांच्या पाचव्या पुण्यस्मरण/ स्मृतिदिनाचे औचित्य साधून, शैक्षणिक, सामा जिक आणि अध्यात्माचा समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे कार्य, समर्पित भावनेने करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणार्या कवयित्री, लेखिका व साहित्य समन्वय महासंघाच्या प्रमुख कार्यवाह मंदाताई नाईक (पुणे), ज्येष्ठ साहित्यिका, कवयित्री व अध्यात्माच्या अभ्यासक उषाताई जोगळेकर (पुणे), संस्कृत व पाली भाषेच्या विदुषी भिक्षुणी संघमित्रा (अकोला), पालवी पुनर्वसन प्रकल्पाच्या अध्यक्षा व एड्सग्रस्तांसाठी कार्यरत समाजसेविका सौ. मंगल अरूण शहा (पंढरपूर, जि. सोलापूर) व संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. झुल्फी शेख (भंडारा) या पंचकन्यांना पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख रु. 11,000/- (रुपये अकरा हजार) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
 
हा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार, 12 मे रोजी, सकाळी 10.30 वा. मानवतातीर्थ म्हणून ओळखल्या जाणा-या रामेश्‍वर (रूई), ता.जि. लातूर येथे संपन्न होणार आहे. या समारंभासाठी बिहारचे पर्यटन राज्यमंत्री प्रमोद कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी दिली.

पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड या भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या सेवेत अत्यंत श्रद्धा, निष्ठा व भक्तिमय असे व्रतस्थ आणि समर्पित जीवन जगल्या. त्यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, हा या पुरस्कार देण्यामागचा हेतू आहे