Breaking News

‘आत्मा मालिक’च्या कर्मचाऱ्यांची विमानाने सहल

कोपरगाव ता. प्रतिनिधी - येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट या अध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रात कार्य करत असलेली संस्था आहे. या संस्थेच्या आश्रमात दिवसभरात हजारो भाविक व पालकांची वर्दळ असते. या भाविकांची चोख व्यवस्था ठेवण्याचे काम येथील सेवकवर्ग करतो आहे. या कर्मचाऱ्यांना स्वतःसाठी वेळ देता यावा, यासाठी प. पू. गुरूदेव माऊलींच्या आशिवार्दाने व संत परमानंद महाराज व अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रम सेवकांसाठी नुकतेच विमान सहलीचे आयोजन करण्यात आले होते. 

मुंबई ते अहमदाबाद असा विमानप्रवास व तेथे दोन दिवस विविध धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांना या सहलीअंतर्गत भेटी देण्यात आल्या. या सहलींचे वैशिष्ट्ये म्हणजे ही सहल खास चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आली होती. या सहलीमध्ये प्रामुख्याने स्वच्छता सेवक, प्रसाद वाटप सेवक, लॉन्ड्री विभागसेवक आदींसह सर्व विभागांचे शिपाई असे एकूण २४५ सेवकांनी या सहभाग घेत सहलीचा आनंद लुटला. या सहलीनंततर या सेवकांनी आपल्या पहिल्या विमानप्रवासाचा अनुभव खूप आनंददायी असल्याचे सांगत संस्थेच्या व्यवस्थापन विभागाला धन्यवाद दिले. या सहलीच्या आयोजनासाठी आश्रमाचे व्यवस्थापक हिरामण कोल्हे, दिलीप हाडोळे, गोपाल कुलकर्णी, शामराव नाईकवाडे आदींनी पुढाकार घेतला.