Breaking News

राज्यांतर्गत वाहतुकीतही आता ई- वे बिल सिस्टिम लागणार


सोलापूर - जीएसटी अंतर्गत एका राज्यातून दुसर्‍या राज्यात मालाची वाहतूक करताना माल वाहतूकदाराला जवळ बाळगाव्या लागणार्‍या इलेक्ट्रॉनिक वे बिल अर्थात ई-वे बिल ही सु विधा आता राज्यांतर्गत वाहतुकीतही 25 मे पासून सरकार लागू करणार आहे. यामुळे करचुकवेगिरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसून कर महसुलात वाढ होईल, असा विश्‍वास सरकारने व्यक्त केला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असल्याची माहिती कर अधिकारी शरद यादव यांनी दिली. 

विक्रीकर भवन येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जीएसटी 1 जुलै 2017 पासून लागू झाल्यानंतर माल वाहतूकदारांसाठी ई-वे बिल पद्धत लागू करणे केवळ नेटवर्क तयार नसल्यामुळे लांबणीवर पडत गेले होते. मात्र जीएसटी प्रत्यक्ष लागू होण्याआधी 17 राज्यांत याची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक चालान पद्धत चांगल्या प्रकारे राबवली गेली होती. परंतु संपूर्ण देशभरात ही पद्धत राबवण्यासाठी त्यावेळी नेटवर्क तयार नव्हते. ते आता तयार झाले असल्यामुळे त्याची अंमलबजावणी 25 मे 2018 पासून ई-वे बिल पद्धत लागू होणार आहे.