Breaking News

सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर सळो की पळो करून सोडणार : आ. बच्चूकडू


सुपा : शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडणारी व शेतकर्‍यांच्या समस्यांवर लढणारी, वेळप्रसंगी आंदोलन करून अगदी तुरुंगवास झाला तरी भूमिपुत्र असणार्‍या शेतकर्‍यांना न्याय देणार्‍या पारनेर तालुक्यातील काही तरुण शेतकर्‍यांनी स्थापन केलेल्या तसेच आता अहमदनगर जिल्ह्यात व राज्यभर शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी दमदार वाटचाल करत असलेल्या, भूमिपुत्र शेतकरी संघटनेला भावी काळात संपूर्ण राज्यभर नक्कीच शेतकरी हक्काचे व्यासपीठ म्हणून पाहतील. संघटनेचे कार्यकर्तेपण सर्वसामान्य भूमिपुत्र शेतकर्‍यांसाठी निष्कलंक, प्रामाणिक काम करतील असे गौरवोद्गार महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त काढले.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव व शेतकरी नेते डॉ. अजित नवले हे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनंजय धोरडे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, सचिव किरण वाबळे, राज्य प्रवक्ते अनिल देठे, पारनेर तालुकाध्यक्ष रोहन आंधळे, उपाध्यक्ष असिफ शेख, जिल्हा उपाध्यक्ष अशोक आंधळे, उपाध्यक्ष सचिन सैद, पत्रकार संघाचे अध्यक्ष मार्तंडराव बुचुडे, माजी अध्यक्ष संजय वाघमारे, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, वनकुटेचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे, दत्ता आवारी, उद्योजक किरण डेरे, उद्योजक मच्छिंद्र लंके हे उपस्थित होते.

आ. कडू पुढे म्हणाले की, कदाचित जातीच्या आधारावर संघटना काढल्या असत्या व कार्यक्रम ठेवला असता तर या कार्यक्रमाला मंडपात जागा पुरली नसती, मात्र हक्काच्या कार्यक्रमासाठी कोणालाही वेळ नाही, जातीसाठी लोक रस्त्यावर उतरतात, एका भोंदू बाबासाठी, सिने अभिनेत्याच्या दुष्कृत्यासाठी लोक रस्त्यावर का उतरतात, हाच प्रश्‍न पडला आहे? हीच आपली शोकांतिका आहे. समाजातील ही परिस्थिती बदलली पाहिजे, यासाठी शेतकर्‍यांनीच आता स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारून वठणीवर आणले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व शेतकर्‍यांनी एकत्र यावे, आपण नक्कीच आपल्या ताकदीच्या जोरावर सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी सळो की पळो करून सोडणार असल्याचे आ. बच्चू कडू यांनी सांगितले.