महिला कुस्ती संघाचे नेत्रदीपक यश
राहुरी : अहमदनगर जिल्ह्याचे भूषण असलेली महानभारतकुमारी किताब विजेती सुवर्णकन्या एन. आय. एस. कोच शबनम शेख हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला कुस्ती संघाने १ सुवर्णपदक, १ रौप्यपदक व ५ कांस्यपदक मिळविले. तशकेंत (उजबेकिस्तान) येथे झालेल्या एशियन चॅम्पीयनशिप स्पर्धेत या संघाने मोठे यश मिळविले.
रेस्लींग फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे ( भारतीय कुस्ती परिषद ) शबनम शेख हिची या स्पर्धेसाठी भारतीय महिला कुस्ती संघाची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. लखनऊ येथे दि. २६ मार्चपासून भारतीय संघातील महिला कुस्तीपटुंना शबनम हिने दि. ९ मे पर्यंत प्रशिक्षण देऊन संघ तशकेंत, उजबेकिस्तानला स्पर्धेसाठी नेला होता. स्पर्धेत ६१ किलो वजन गटात अंशु हिने सुवर्णपदक मिळविले. मानसी हिने ५७ किलोमध्ये रौप्यपदक मिळविले. विजयी संघाचे दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, ऑलम्पिकमध्ये खेळून देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा तिचा मानस आहे. शबनम ही कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथील सेवानिवृत्त लष्करी जवान शब्बीर शेख यांची कन्या असून राहुरी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मुखतार सय्यद यांची भाची आहे. या कामगिरीबद्दल तिचे आणि यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
