Breaking News

कोपरगाव पाणी योजना राबविण्‍याचा अट्टाहास कोणाचा?


राहाता :  निळवंडे धरणातून कोपरगाव शहरासाठी थेट पाईपलाईन योजनेतून दुष्‍काळी पट्ट्यातील ७ गावे वगळण्‍याचा निर्णय कोणाच्‍या दबावाखाली घेण्यात आला, कोपरगाव पाणी पुरवठा योजना राबविण्‍याचा अट्टाहास कोणाचा आहे, याचा खुलासा शिर्डी संस्‍थानने करावा, अशी मागणी खडकेवाके, को-हाळे, डो-हाळे, केलवड, वाळकी, नादुर्खी खुर्द आणि बुद्रूक या गावच्‍या सरपंचांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्‍या निवेदनाद्वारे सातही गावच्‍या सरपंचांनी शिर्डी संस्‍थानच्‍या विश्‍वस्‍त मंडळाच्‍या बैठकीत या योजनेच्‍या झालेल्‍या निर्णयाबाबत आक्षेप नोंदविला. या निर्णयाची माहितीदेखील मिळावी, अशी अपेक्षा या सरपंचांनी व्‍यक्‍त केली आहे. खडकेवाके, को-हाळे, डो-हाळे, केलवड, वाळकी, नादुर्खी खुर्द आणि बुद्रूक ही शिर्डी शहरालगतची गावे दुष्‍काळी पट्ट्यातली आहेत. या गावांमध्‍ये संस्‍थानचेच कर्मचारी व व्यायवसायिकांचे मोठ्या प्रमाणात वास्‍तव्‍य आहे. शिर्डीत येणा-या भाविकांची वर्दळही याच गावांमधून सुरु असते. तथापि या गावांमध्‍ये गोदावरी कालव्‍यांवरुन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. परंतु वाढती लोकसंख्‍या पाहाता यामध्ये पाणी पुरवठा योजनांच्‍या मर्यादा स्‍पष्‍ट आहेत. त्‍यातच उघड्या मार्गाने हे पाणी येत असल्‍याने प्रदुषित पाण्‍याचा उपयोग या गावांना करावा लागतो. ही वस्‍तुस्थिती प्रामुख्‍याने संस्‍थानच्‍या निदर्शनास निवेदनाव्‍दारे आणून देण्‍यात आली.

यासर्व पार्श्वभूमीवर निळवंडे धरणाच्‍या लाभक्षेत्रातील शिर्डी पाणी पुरवठा योजनेत या गावांचा समावेश करण्‍यात यावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्‍थांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे यांनी ग्रामस्‍थांच्‍या या मागणीच्‍या केलेल्‍या पाठपुराव्‍यामुळे या गावांचा समावेश या पाणी योजनेत करण्‍यास राज्‍य सरकारने तत्‍वत: मान्‍यता दिली. तथापि साईसंस्‍थानने आता या सात गावांना वगळून कोपरगाव शहराचा समावेश निळवंडे पाईपालाईन योजनेत केल्‍याचे या सातही गावांच्या सरपंचांचे म्‍हणणे आहे. याबाबत संस्‍थानने घेतलेल्‍या निर्णयावर आक्षेप नोंदवितानाच ही सात गावे वगळण्‍याचा विश्‍वस्‍त मंडळात कोणी प्रयत्‍न केला, कोपरगाव पाणी पुरवठा योजना राबविण्‍याचा ही टंचाईग्रस्‍त सात गावे वगळून फक्‍त कोपरगाव शहराचा या योजनेत समावेश करण्‍याचा निर्णय कोणाच्‍या दबावाखाली घेण्‍यात आला याचा, खुलासा करण्‍याची मागणी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍याकडे करण्‍यात आली आहे.