विजेच्या तारांमुळे घर आणि गोठ्याला आग १४ शेळ्या दगावल्या ; ३ लाखांचे नुकसान
कोल्हार-राजुरी रस्त्यावर तीनचारी येथे फकीरा कारभारी खाटेकर व लखन सोन्याबापू शिंदे हे राहत आहेत. काल {दि. २९} दुपारी अचानक त्यांच्या घरावरील तारा छपरांवर कोसळल्या. या तारांचे घर्षण होऊन त्याचे लोळ छ्प्पररावर पडल्याने त्यावर असलेल्या चा-याने पेट घेतला. वारा असल्याने ही आग वेगाने सर्वत्र पसरली. या आगीत एकूण १४ शेळ्या होरपळून मरण पावल्या. त्याचसोबत दोन पत्र्यांचे राहते घर व दोन छप्पर आगीच्या भक्षस्थानी पडून भस्मसात झाले. त्यामुळे घरातील सर्व संसारोउपयोगी वस्तूंची राखरांगोळी झाली. आग लागताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने चारीला पाणी असल्याने मिळेल, त्या भांड्याने पाण्याचे फवारे मारून शेकडो नागरिकांनी आग विझविली. मात्र वेगाने वाहणा-या वा-या मुळे आग आटोक्यात येत नव्हती. तरीही नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझविली. मात्र दरम्यानच्या कळात घरातील अन्न धान्य, सायकल, भांडे आदी या आगीमध्ये जळून राख झाले. खाटेकर यांनी अवघ्या दोन दिवसांपूर्वी गाय विकली. त्यातून आलेले ६० हजार रुपयेदेखील जळून गेले.
या घटने नंतर कोल्हारचे ग्रामसेवक प्रल्हाद सुकेकर, तलाठी सुरेखा अबुज, सहाय्यक राजू गायकवाड यांनी घटनास्थळी तातडीने येऊन पंचनामा केला आहे. दुपारी २ नंतर महावितरणचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, ही आग महावितरणच्या तारांमुळे लागली की अन्य काही कारण आहे, याची शहानिशा झाल्यानंतरच सत्य समोर येईल.
धोकादायक तारांची दुरुस्ती करा
या भागात महावितरणच्या तारा थेट घरांच्यामधून जात आहेत. तीनचारी येथे ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या जागेवर असणा-या घरांची उंची सुमारे १० ते १२ फूट आहे. मात्र महावितरण वीज कंपनीच्या तारा या घरापेक्षाही कमी उंचीवर आहेत. त्यामुळेच ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी धोकादायक तारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.