Breaking News

मागासवर्गीयांच्या प्रश्‍नांसाठी आरपीआयची जोरदार निदर्शने


अहमदनगर-मागासवर्गीयांच्या विविध प्रश्‍नासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने येवून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणानून निघाला. 

आंदोलनात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, संजय कांबळे, युवक शहर जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे, युवकचे भिंगार शहराध्यक्ष अमित काळे, नगर तालुकाध्यक्ष विशाल कांबळे, अजय साळवे, आरती बडेकर, विनोद भिंगारदिवे, राजू उबाळे, बालाजीराजे भोसले, बाबा राजगुरु, पोपट सरोदे, राहुल जाधव, नाना पाटोळे, सुशांत म्हस्के, दया गजभिये, अनिकेत केदारे, विवेक भिंगारदिवे, चंद्रकांत ठोंबे, सुनिता घोडके, सदाशिव भिंगारदिवे, सतिष सुर्यवंशी आदिंसह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

भिमाकोरेगाव प्रकरणी षडयंत्र रचणार्‍या आरोपींना अटक व्हावी. कायद्यापेक्षा कोणी मोठा नसून, संभाजी भिडे यांच्या सह या षडयंत्रात सहभागी असलेल्यांना अटक करावी. या प्रकरणातील साक्षीदार असलेली पूजा सुरेश सकट हिची हत्याच झाली असून मारेकर्‍यांवर कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल व्हावा. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल न करता कायद्याचे संरक्षण झाले पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर दलित व आदिवासी विरुध्द कलम 395 नुसार दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करणार्‍यांवरही कठोर कारवाई व्हावी. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लवकर संसदेत कायदा करावा. अनुसूचित जाती-माती, ओबीसी व भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी. जम्मू काश्मीर मधील कठुआ, उत्तरप्रदेश मधील उन्नाव तसेच देशभरातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी आदि मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले.