वनविभागाने केले बिबट्याला जेरबंद
पुणे, दि. 11, मे - शिरुर तालुक्यातील निमोणे येथे वावरत असलेला बिबट्याला वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात जेरबंद करण्यात यश आले आहे. या बिबट्याला जेरबंद केल्यामुळे येथील नाग रिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. निमोणे येथील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. ग्रामस्थांना शेतात आणि रस्त्याने जाताना अनेकवेळा बिबट्याचे दर्शन झाले होते. या परिसरातील अनेक शेळ्या आणि कुत्र्यांचा फडशा या बिबट्याने पाडला होता. बिबट्याच्या दहशतीमुळे येथील नागरिक भयभीत झाले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी या भागात शनिवारी विठ्ठल काळे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. 3 दिवसांच्या हुलकावणीनंतर चौथ्या दिवशी हा बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाला. त्यानंतर शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिका-यांनी जेरबंद बिबट्या ताब्यात घेत त्याच्यावर उपचार करून त्याची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे निवारा केंद्रात करण्यात आली.