Breaking News

पश्‍चिम महाराष्ट्रात नवीन वीजमीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध


पुणे- पश्‍चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोडण्या व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत सिंगल व थ्री फेजचे 1 लाख 14 हजार 986 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या माहितीवर विश्‍वास ठेऊ नये तसेच नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांनाही थारा देऊ नये असे आवाहन महा वितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यासाठी सिंगल फेजचे 25 हजार आणि 10-40 अ‍ॅम्पीअर थ्री फेजचे 5014 नवीन वीजमीटर नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासह आता या सर्व जिल्ह्यांमध्ये सिंगल फेजचे 91 हजार 449 आणि थ्री फेज 10-40 अ‍ॅम्पीअरचे 23 हजार 537 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. पुणे जिल्ह्यात (कंसात - थ्री फेज 10-40 अ‍ॅम्पीअर) सिंगल फेजचे 51,291 (8977), सातारा जिल्ह्यात सिंगल फेजचे 8242 (3611), सोलापूर जिल्ह्यात 10636 (4704), कोल्हापूर जिल्ह्यात 6499 (3880) आणि सांगली जिल्ह्यात 14,781 (2365) नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. 

पश्‍चिम महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या नवीन वीजमीटरची संख्या ही सद्यस्थितीत नवीन वीजजोडणी तसेच सदोष किंवा नादुरुस्त वीजमीटर बदलण्याच्या तुलनेत अधिक आहे. पेडपेडींगमधील नवीन वीजजोडणी ताबडतोब देण्याचे तसेच नादुरुस्त वीजमीटर सुद्धा तातडीने बदलण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत.