Breaking News

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही -दीप चव्हाण

अहमदनगर - तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरारीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्‍व थक्क करणारे आहे. म्हणुनच या महाराष्ट्राचे देशाच्या विकासात असलेले योगदान हे कोणीही नाकारू शकत नसल्याचे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी केले.
 
1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुढे चव्हाण म्हणाले की, महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली आहे. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषी-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्म समभावाचे पालन करीत रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन करीत बलिदान दिल्याचे त्यांनी सांगितले.