Breaking News

तळेगाव आणि साकूर पट्टा सोसतोय दुष्काळाच्या झळा!

तालुक्यातील नेहमी दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळेगाव व साकुर परिसरात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल आहेत. येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दही दिशा वणवण करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या गरमीने त्रस्त झालेला तळेगाव आणि साकूर हा पट्टा सध्या प्रचंड दुष्काळ झाला सोसताना दिसत आहे. 

याभागातील बहुतेक गावात व वाडीवस्तीवर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष बघावयास मिळत आहे. संगमनेर पंचायत समितीकडून सध्या तालुक्यातील एकूण १३ गावांसह ५३ वाडी मिळून जवळपास २५ हजार लोकसंख्येला १० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्याचे काम सध्या सुरु आहे. यामध्ये कर्जुले पठार, वनकुटे, पानोडी, चिकणी, सायखिंडी, पिंपळे, सावरगाव घुले, दरेवाडी, वरवंडी, डिग्रस, सोनेवाडी, निमोण, मालुंजे अशा १३ गावांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त निमगावजाळी व पारगाव बुद्रुक या गावांसाठी टँकरच्या मंजुरीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहेत.

याकामी शासनाकडून चार विहिरी व एक उदभव अधिग्रहित करण्यात आला आहे. यासाठी सात शासकीय व तीन खाजगी अशा एकूण दहा टॅंकरने दररोज ४३ खेपा पूर्ण करून त्याभागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला तालुक्यात अशी परिस्थिती असताना पुढील दोन महिन्यात आणखी किती संभाव्य गावे वस्ती दुष्काळाच्या छायेत आहेत आणि त्यासाठी आणखी किती टँकर शासनाला पुरवावी लागतील, याचा अभ्यास शासनाकडून सुरु आहे.