किल्ले सिंधुदुर्गवर वाढता प्लास्टिक कचरा
सिंधुदुर्ग, दि. 05, मे - किल्ले सिंधुदुर्गवर सध्या प्लास्टिक कच-यामुळे तसेच स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सुविधा नसल्याने अस्वच्छता पसरली आहे. पर्यटन कर आकारणी होऊनही पर्यटकांना अत्यावश्यक सुविधा दिल्या जात नसल्याने पर्यटक तसेच किल्ला रहिवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यास लाखो पर्यटक भेट देतात. या पर्यटकांना सुविधा देण्यासाठी पर्यटन कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेली दोन वर्षे किल्ल्यात येणाऱया पर्यटकांकडून कर आकारणी केली जात आहे. पहिल्याच वषी पर्यटन कराच्या माध्यमातून किल्ल्यात फिरती स्वच्छतागृहे, बैठक व्यवस्था तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र या पर्यटन हंगामात स्वच्छता मोहीम, पर्यटकांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांना पाण्याची सुविधा तसेच अन्य सुविधांकडे लक्ष पुरविण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे.
सद्यस्थितीत किल्ले सिंधुदुर्गवर मोठया प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. या पर्यटकांकडून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कर घेतला जात आहे. मात्र पर्यटकांना कोणत्याही सुविध नसल्याने पर्यटक ांचे हाल होत आहेत. किल्ल्यात प्लास्टिक कचऱयाची समस्या वाढली आहे. किल्ल्यात काही ठिकाणी फिरती शौचालये बसविण्यात आली आहेत. मात्र त्यांचे दरवाजे तुटले आहेत. काही शौचालयांना पाण्याची सुविधाच नसल्याने ती अस्वच्छ झाली आहेत. परिणामी किल्ल्यात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवषी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साफसफाईसाठी एका कर्मचाऱयाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र सध्या किल्ल्यात साफसफाईसाठी एकही कर्मचारी नसल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देत ही समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.