वेंगुर्लेत 8 मे पासून आंतरराष्ट्रीय आंबा परिषद
सिंधुदुर्ग, दि. 05, मे - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि इंटरडीसीप्लीनरी सोसायटी फॉर अॅडव्हांसमेंट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रामध्ये 8 ते 11 मे या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी आंतरराष्ट्रीय आंबा प रिषद प्रथमच होत आहे.
आंबा परिषदेच्या निमित्ताने जगभरातील आंबा शास्त्रज्ञ, बागायतदार, व्यापारी व विद्यार्थ्यांना आधुनीक तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करण्याची संधी या परिषदेच्या माध्यमातून मिळणार आहे. प रिषदेमध्ये जागतिक पातळीवरची आंब्याची सद्यस्थिती, वातावरणातील बदल, आनुवंशिकता आणि प्रजोत्पादन, अभिवृद्धी आणि नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन, शाश्वत उत्पादन आणि कृषी तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि कृषी अर्थशास्त्र, आंबा पिकातील निर्यात आणि सद्यस्थिती व भविष्यातील दिशा इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
तसेच आंबा बागायतदार व शास्त्रज्ञ यांचे चर्चासत्र, त्याचबरोबर कृषिविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये आंब्याच्या विविध जातींचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. इच्छुक शेतकर्यांसाठी सुवर्ण कोकण फौंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने प्रशिक्षण आयोजित करण्यात आहे आहे.
प्रशिक्षणामध्ये फळबाग व भाजीपाला, रोपवाटिका व्यवस्थापन, बांबूची शेती, मसाला पिके तंत्रज्ञान, दुग्धव्यवसाय, गांडूळ खतनिर्मिती, पशुपालन, गोपालन आणि दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन या विषयांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच पिंजर्यातील मत्स्यसंवर्धन या विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही आंतरराष्ट्रीय आंबा परिषद आंबा बागायतदारांसाठी तसेच शेतकर्यासाठी खास पर्वणी ठरणार आहे, अस प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ.प्रदीप हळदवणेकर यांनी सांगितले.