तहसीलच्या पथकावर वाळू तस्करांकडून हल्ला
राहाता : तहसीलच्या पथकावर वाळू तस्कराकडून शिंगव्यात हल्ला करण्यात आला. यात एका कर्मचाऱ्याच्या खिशातील रोख रक्कम व सोन्याची अंगठी चोरून नेण्यात आली. या पथकाच्या अंगावर ट्रँक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राहाता पोलिसांनी १५ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला.
आज {दि. १८} सकाळी साडेआठच्या सुमारास शिंगवे येथे ही घटना घडली. गोदावरी नदीतून होणारी बेसूमार वाळू चोरी रोखण्यासाठी राहाता तहसिलदारांच्या आदेशाने पथके तैनात करण्यात आली आहेत. शिंगवे तलाठी दिलीप कुसळकर, अस्तगांव तलाठी हरीप्रसाद माळी, कारकून शुक्लेश्वर इजगे, लिपिक पोकळे आदी गस्त घालत असताना दोन वाळूने भरलेले ट्रँक्टर जात होते. या पथकाने ते अडवून ताब्यात घेत तहसील कार्यालयाकडे नेत असताना १५ ते २० जणांनी ट्रँक्टर अडवून सरकारी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. मछिंद्र पोकळे या कर्मचाऱ्यास धरून त्याच्या खिशातील १ हजार १०० रूपये रोख व हातातील ६ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी पळवून नेली. या पथकाच्या अंगावर ट्रँक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वाळूचे भरलेले ट्रँक्टर पळवून नेले. या घटनेची माहीती मिळताच तहसिलदार माणिकराव आहेर, नायब तहसिलदार राहुल कोताडे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा पाठलाग केला. मात्र ते पळून गेले. दरम्यान, एका आरोपीची दुचाकी ताब्यात घेतली.
याप्रकरणी शिंगव्याचे तलाठी दिलीप कुसळकर यांच्या फिर्यादीवरून शंकर रामचंद्र दुशींग, संदिप माधव पवार, भाऊसाहेब कोंडाजी वाडगे आदींसह १० ते १२ जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला.