संगमनेर जिल्हा कृती समितीचे उपोषण अखेर मागे
संगमनेर : संगमनेर जिल्हा कृती समितीच्यावतीने गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण माजी पाटबंधारेमंत्री बी. जे. खताळ यांच्या प्रमुख उपस्थित मागे घेण्यात आले. संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे, या मागणीसाठी हे साखळी उपोषण करण्यात आले होते.
या उपोषणादरम्यान संगमनेर बसस्थानकाजवळ सह्यांची मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर दि. ३ एप्रिल पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. जिल्हा कृती सामीतीच्यावतीने दिड लाख सह्यांचे रजिस्टर फोटो अलबम व निवेदन देण्यात आले. राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवून जिल्हा विभाजन केले जाईल आणि अहमदनगर जिल्हयाचे विभाजन करताना संगमनेर जिल्हा कृती समितीला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देत संगमनेरात सुरू असलेले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर कृती समितीने उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
उपोषणकर्ते अमर कतारी, नारायण खुळे, सुशांत पावसे, सुधाकर पिसे, रामचंद्र कपिले, मल्लू लोखंडे या उपोषण कार्यकर्त्यांना लिंबू पाणी देऊन ४५ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी कृती समितीचे राजाभाऊ देशमुख, राजेश चौधरी, शरद थोरात, अशोक सातपुते, संजय नाकील, सचिन साळवे, विवेक भिडे, नीलिमा घाडगे, गोरक्ष नेहे, रमेश काळे, सतीश आहेर, दीपक साळुंके आदींसह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.