Breaking News

समुद्रात मान्सूनची चाहूल


सिंधुदुर्गनगरी - गेले दोन दिवस वातावणात उष्म्याने वाढ झाली असताना समुद्रातही पावसाळी वातावरण तयार होऊ लागले आहे. समुद्रातील करंट वाढल्याने पाणी प्रचंड वेगाने ऊसळू लागले आहे. समुद्री तळ गढूळ बनल्याने सिंधुदुर्ग किल्ला होडी सेवा आणि स्कुबा डायव्हिंग व्यवसाय शनिवारपासून बंद करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्ग पाहण्यासाठी आलेल्या शेकडो पर्यटकांना बंदर जेटीवरूनच किल्ल्याचे दर्शन घ्यावे लागले. सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक आणि खाडीतील बोटिंग आदी जलपर्यटनासाठीची अधिकृत मुदत 25 मेपर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर जलपर्यटन सुरू ठेवायचे की नाही, या संदर्भात हवामानाचा अंदाज घेऊन मुदतवाढीचे धोरण बंदर विभागाकडून अवलंबिले जाणार आहे. गतवर्षी तीन दिवसांची मुदतवाढ दिली गेली होती. दरम्यान, शहरातील सर्व स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव स्कुबा डायव्हींग बंद ठेवले होते.

समुद्राच्या अंतर्गत पाण्याचा जोर वाढल्याने पाणी गढूळ बनले होते. बऱयाच व्यावसायिकांनी पर्यटन बोटी किनाऱयावर आणल्या आहेत. मान्सून जवळ आल्याने समुद्र खवळण्यास सुरुवात झाली आहे. यात समुद्राच्या अजस्त्र लाटांचा तडाखा शुक्रवारी किनारपट्टीस बसला. किनाऱयावर उभ्या करून ठेवलेल्या छोटया होडयांपर्यंत समुद्री लाटांचे पाणी घुसल्याने होडया सुरक्षित ठिकाणी हल विण्यासाठी मच्छीमारांची एकच धांदल उडाली. पावसाळयापूर्वी सुरू होणाऱया समुद्रांतर्गत बदलासही सुरुवात झाली आहे.

समुद्र खवळण्याबरोबर लाटांच्या उंचीतही मोठी वाढ झाली आहे. समुद्राच्या लाटांचे पाणी किनाऱयावर येण्यास सुरुवात झाली आहे. यात खवळलेल्या समुद्रामुळे निर्माण झालेल्या लाटांचा तडाखा कि नारपट्टी भागास बसला. किनाऱयावर स्थानिक मच्छीमारांनी आपल्या मासेमारी नौका उभ्या करून ठेवल्या आहेत. लाटांच्या मोठया माऱयामुळे किनाऱयालगत मोठी धूप झाली. त्यामुळे नौका उभ्या करून ठेवलेल्या ठिकाणापर्यंत पाणी घुसल्याने नौकांना धोका निर्माण झाला होता. दरवर्षी पावसाळयात सागरी उधाणाचा फटका किनारपट्टीस बसतो. लाटांचे पाणी वस्तीत घुसण्याचे प्रकार याहीपूर्वी येथे घडले आहेत. आता पावसाळा सुरू होण्यापूर्वीच समुद्री लाटांच्या अतिक्रमणामुळे किनारपट्टीवर मोठया प्रमाणात धूप झाल्याचे दिसून आले. किनारपट्टी भागात मोठया प्रमाणात मच्छीमारांच्या नौका उभ्या करून ठेवलेल्या असतात. समुदी लाटांचे पाणी आत घुसू लागल्याने सर्वच मच्छीमारांना नौका सुरक्षित ठिकाणी न्याव्या लागणार आहेत.