Breaking News

राणेंच्या लाईफ टाइम हॉस्पिटलचं मुख्यमंत्र्यांचा हस्ते शानदार उदघाटन


सिंधुदुर्गनगरी - संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या राणेंच्या अतिभव्य अशा लाईफ टाइम हॉस्पिटलचा शानदार उदघाटन आणि लोकार्पण सोहळा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. कोकणात एवढे भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल उभारण्याचं धाडस केवळ राणेच करू शकतात, असं सांगून शासनाच्या विविध योजनेचा लाभ लवकरच येथे मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगून राणेंचं यावेळी तोंड भरून कौतुक केलं.
 
सुसुज्ज आरोग्य सुविधेअभावी कोकणच्या जनतेची होणारी परवड पाहून कोकणचे लोकनेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पडवेच्या माळरानावर आंतराराष्ट्रीय दर्जाचं सुसुज्ज हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न तीन वर्षांपूर्वी पाहिलं. आणि बघता बघता पडवेच्या निर्जन माळरानावर मोठमोठ्या महानगरांना लाजवेल, असं लाइफटाइम हॉस्पिटल उभारलं गेलं. सुमारे 60 एकर परिसरात विस्तारलेल्या या हॉस्पिटलचा उदघाटन आणि लोकार्पण सोहळा रविवारी संपन्न झाला. या सोहळ्याला सर्वपक्षीय मान्यवरांसह कोकणी जनतेनं देखील प्रचंड गर्दी केली होती. मान्यवरांचे आगमन होताच मालवणच्या स्वराज्य महिला ढोलपथकाने त्यांचे स्वागत केले. तर शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उदघाटन झाल्यानंतर राणेंनी स्वतः सर्व मान्यवरांना रुग्णालयाचा परिसर आणि उपलब्ध सुविधांची माहिती दिली. त्यानंतर मान्यवरांचे सभागृहात आगमन झाले. व्यासपीठावर निलेश राणे आणि नितेश राणे यांनी या मान्यवरांचे स्वागत केले.

एवढं विशाल आणि अतिभव्य हॉस्पिटल मुंबईतही पाहिलं नसल्याचं सांगून महसूलमंत्री चंदकांत पाटील यांनी लाइफटाइम हॉस्पिटलचे कौतुक केले. हे प्रचंड हॉस्पिटल पाहून एकदा तरी आजारी पडावं असा विचार येत असल्याचे सांगताच सभागृहात एकच हंशा पिकला. 

पवार यांनी लाईफ टाइम हॉस्पिटलच्या भव्यतेचं कौतुक केलं. एखाद काम हाती घेतलं कि ते नीटनेटकं करायचं, हा राणेंचा स्वभावधर्म असल्याचं सांगून इथल्या हिरव्यागार वनराईच्या सानिध्यात आल्यावर रुग्ण अर्धा अधिक बरा होईल, असे ते म्हणाले. कोकणी जनतेची उपचारासाठी मुंबई, गोवा, कोल्हापूरला जायची गरज देखील आता संपणार असल्याचे पवार म्हणाले.

फडणवीस यांनी नारायण राणे यांचं तोंड भरून कौतुक केलं. राणे हे व्हिजन असलेले नेतृत्व असल्याचे सांगून नारायणराव राणे यांच्यासारखा नेता निर्माण केल्याबद्दल कोकणी जनतेचे आपण आभार मानतो, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राणेंचा गौरव केला. हे हॉस्पिटल मुंबईत उभारलं असत तर राणेंनी कोट्यवधी रुपये मिळवले असते. पण कोकणी जनतेवरील प्रेमापोटीच राणेंनी स्वतःच्या फायद्या तोट्याचा विचार न करता हे हॉस्पिटल कोकणातील दुर्गम अशा गावात उभारल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.