Breaking News

कुकडीच्या अभियंत्याने शेतकर्‍याला धमकावले कारवाईची मागणी; 2 जूनला शेतकरी करणार धरणे आंदोलन

कुळधरण / प्रतिनिधी । श्रीगोंदा येथील कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्याने कर्जत तालुक्यातील धालवडी येथील शेतकर्‍यास फोनवरून अरेरावीची भाषा वापरत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात शेतकर्‍याने निवेदन लिहून अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

धालवडी येथील बापुराव सुपेकर यांना उपअभियंता साठे यांनी फोनवरून अरेरावीची भाषा वापरत धमकी दिल्याचे सुपेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. कार्यकारी अभियंता यांना लिहिलेल्या निवेदनात सुपेकर यांनी घडलेला प्रकार मांडला आहे. बापुराव सुपेकर हे बुधवारी त्यांच्या शेतानजिकच्या येसवडी चारीवर आवर्तनाचे पाणी आले का? हे पाहण्यासाठी गेले असता तेथे कुकडीचे कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी साठे यांच्याशी संपर्क केला असता, यावेळी तू चारीवर का गेला? तू पुढारपण करतो, पेपरबाजी करुन आम्हाला त्रास देतोस, तुला आता धडा शिकवतो, तू नीट रहा नाहीतर तुला गाडी घेवून येवून पोलिसांच्या ताब्यात देतो, तू राजकारण करतो असे म्हणत साठे यांनी धमकावले असल्याचे म्हटले आहे.
कार्यकारी अभियंता साठे यांनी पदाचा गैरवापर करुन धमकावल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनातुन केली आहे. तात्काळ कारवाई करावी अन्यथा कुळधरण, धालवडी भागातील शेतकरी श्रीगोंदा येथील कुकडीच्या कार्यालयात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा सुपेकर यांनी दिला आहे.


संघर्ष समितीकडुन अधिकार्‍याचा निषेध
धालवडी येथील शेतकर्‍यास झालेल्या धमकीचा येसवडी कुकडी चारी संघर्ष समितीच्या वतीने निषेध करण्यात आला. उपाध्यक्ष शशिकांत लिहिणे, मोहन सुपेकर, बंडु सुपेकर आदींनी पत्रक काढून निषेध केला आहे. अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना गृहित धरु नये. अरेरावीचा प्रकार निषेधार्थ असल्याचे पत्रकात म्हटले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे यांनीही घटनेचा निषेध केला आहे.