अमरावती जिल्ह्यातील ढेंगाळा गावाच्या पुनर्वसनास तत्वतः मान्यता - चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरण तथा पुनर्वसन संनियंत्रण समितीची पहिली बैठक आज मदत व पुनर्वसन मंत्री तथा समितीचे अध्यक्ष श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समितीचे उपाध्यक्ष माधव भांडारी, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रभारी सचिव अतुल पाटणे आदी यावेळी उपस्थित होते.
गोदावरी खोऱ्यातील बेंबळा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील साखळी नदीवर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात हरणी गावाजवळ हे धरण बांधण्यात येत आहे. हे धरण २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून या धरणामुळे एकूण ९.३४ दलघमी पाणी साठा होणार आहे. या धरण प्रकल्पामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजा ढेंगाळा गाव पूर्णतः बाधित होणार आहे. या गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव समितीपुढे आज आणण्यात आला. स्वेच्छा पुनर्वसनाच्या प्रस्तावास आज श्री. पाटील यांनी मान्यता दिली. ढेंगाळा गावातील १७ घरातील २३ कुटुंबे बाधित होणार आहे. ढेंगाळा गावातील या बाधित कुटुंबियांना स्वेच्छा पुनर्वसन योजनेनुसार मदत देण्याचे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.