Breaking News

रेहकुरी अभयारण्यातील पाणवठे कोरडे; पशु-पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती

उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्याची जाणीव मनुष्य प्राण्याबरोबरच इतर प्राणीमात्रांना होत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येत आहे. त्याचबरोबर पाण्यासाठी वन्य प्राणी इतरत्र भटकताना दिसून येत आहेत. यावर्षी चांगला पाऊस पडल्याने एप्रिलपर्यंत पाणीसाठे उपलब्ध होते. मात्र मे महिना सुरू झाला आहे. ंआणि पाण्याची कमतरता भासू लागली आहे. वन्य पशुपक्ष्यांना वनक्षेत्रामध्येच पाणी उपलब्ध व्हावे, पाण्यासाठी पशुपक्ष्यांना भटकंती करण्याची वेळ येवू नये यासाठी वनविभागामार्फत दरवर्षी पाणवठे तयार केले जातात. अशाच प्रकारे कर्जत तालुक्यातील वन विभागाने वनक्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार केलेले आहेत. मात्र अद्याप या पाणवठयात पाणी सोडले जात नाही, अशी तक्रार वन्यप्रेमी कार्यकर्ते रामदास सुर्यवंशी यांनी वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली आहे.


या तक्रारीत म्हटले आहे की, कर्जत तालुक्यात अधिक प्रमाणात जंगलविभाग असुन या जंगलात काळवीट, हरणे, लांडगे, रानडुकरे, ससे, सरपटणारे प्राणी, त्याचबरोबर पक्षी वास्तव्यास आहेत. या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वन-वन भटकावे लागत आहे. पाण्यासाठी हे प्राणी भटकत गाव, वस्तीवर, व शेतकर्‍यांच्या शेतावर येत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे पिकाची नासाडी होत आहे. या प्राण्यांना पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी रेहकुरी येथील वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल येळे यांची असताना ते आपली जबाबदारी झूगारून देत असताना दिसत आहेत. यामध्ये एखाद्या निष्पाप पशु-पक्ष्याचा पाण्यावाचून बळी गेल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल तालुक्यातील नागरीक करत आहेत. अनेकदा सुचना करूनही त्यांचेकडून मुद्दाम कामात हालगर्जीपणा केला जात आहे.