Breaking News

ग्रामस्थांच्या उत्साहवाढीला जिल्हाधिकारी सरसावल्या....! खामखेड येथे जिल्हाधिकारी डॉ निरूपमा डांगे यांनी केले श्रमदान

 सातत्याने होणारे अवर्षण.. अवेळी पडणारा पाऊस.. कमी कालावधीत तीव्रतेचा पाऊस.. ही सर्व आताच्या लहरी निसर्गाची काही उदाहरणे आहेत. या परिस्थितीमुळे भूजल खालावत आहे आणि नेमेची येते पाणीटंचाई ही उक्ती रूढ होत आहे. ही परिस्थिती बदलविण्यासाठी .. भूजल पातळी वाढण्यासाठी जलसंधारण व मृदसंधारणाची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून वाटर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील जळगांव जामोद, संग्रामपूर व मोताळा तालुक्यांचा समावेश आहे.

या तालुक्यांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्रमदान करून स्पर्धेत अव्वल ठरण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशा ग्रामस्थांचा उत्साह वाढविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी श्रमदान करण्यासाठी मोताळा तालुक्यातील खामखेड येथे पोहोचल्या. त्यांनी आज 2 मे 2018 रोजी मातीनाला बांधकामासाठी श्रमदान केले व गावकर्‍यांचा उत्साह वाढविला.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे व ग्रामस्थ उपस्थित होते. डोंगराच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा खामखेड येथे सकाळीच जिल्हाधिकारी यांची गाडी पोहचली व ग्रामस्थ बुचकळ्यात पडले. एवढ्या सकाळी मोठ्या अधिकार्‍याची गाडी कशी काय. मात्र जिल्हाधिकारी श्रमदान करण्यासाठी आल्या हे त्यांना कळल्यावर त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. जिल्हाधिकारी लागलीच माती नाला बांधकाम सुरू असलेल्या स्थळी पोहोचल्या व माती उचलून नाल्याच्या कडेला टाकत कामाची चौकशी केली. त्यांचे हे काम बघून महिला पुढे आल्या व सुरू झाली श्रमदानाची श्रृंखला. येथून पुढे कोल्ही गोलर येथील गाळ काढलेल्या धरणाची पाहणी करण्ययासाठी जिल्हाधिकारी निघून गेल्या.