पुणे : सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी ग्रामीण डाक सेवकांनी आंदोलन सुरू केले आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात टपाल खात्याचे दररोजचे सुमारे दहा लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. याशिवाय ग्रामीण भागातील सर्व टपाल व्यवहार ठप्प झाले आहेत. अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना व नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक संघाच्यावतीने हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात देशभरातील दोन लाख 70 हजार ग्रामीण डाक सेवक आणि पुणे जिल्ह्यातून पंधराशेहून अधिक सेवक सहभागी झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील टपाल सेवा ठप्प झाली आहे. ग्रामीण भागात टपाल वाटप, तिकिट विक्री, बचत खात्यात पैसे जमा करणे आदी कामे डाक सेवकांमार्फत केली जातात. संपामुळे या कामकाजावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात टपाल खात्यांची प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सब-कार्यालय आहे. या सब-कार्यालयातून तालुक्याच्या अंतर्गत येणार्या गावांमध्ये छोटी छोटी टपाल कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. ही सर्व टपाल कार्यालये डाक सेवकांमार्फतच सुरू असतात. आता हेच डाक सेवक संपावर गेल्याने ही कार्यालये बंद आहेत. त्यामुळे सब-कार्यालयांवर देखील याचा परिणाम होत आहे.
डाक सेवकांच्या संपामुळे व्यवहार ठप्प
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:59
Rating: 5