Breaking News

पॉस मशीनऐवजी पावती पध्दतीने धान्य देण्याची नागरिकांची मागणी


जामखेड : शहरातील नागरिकांना रेशन दुकानातून मिळणारे स्वस्त धान्य तहसील व अन्न पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे मागील 2-3 महिन्यांपासून मिळालेच नाही. रजिस्टरला नोंद आहे मात्र ऑनलाईनला नाही, तर कुठे पॉस मशीनमध्ये बिघाड, तर कुठे बोटाचे ठसेच दाखवत नाही, तर कुठे रेशन दुकानदारच गायब अशा परिस्थितीत हजारो रेशनधारक लाभार्थी असूनही त्यांना 2-3 महिन्यांपासून धान्यच मिळाले नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जामखेडमध्ये एकाही रेशन दुकादाराने पूर्ण माल वितरित केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासनाच्या निर्धारित केलेल्यापेक्षा कमी धान्य वितरण केल्याच्या कारणावरून दुकानदारांवर का कारवाई होत नाही? याबाबत तहसीलदारांना विचारले असता ऑनलाईन प्रक्रिया वरूनच बिघडली आहे, आम्ही काय करणार असे बिनबुडाचे व बेजबाबदार उत्तर त्यांचेकडून मिळाले. दुकानदारांशी विचारणा केली असता, पॉस मशीन मध्ये काहीतरी अडचण आहे. अनेक ग्राहकांचे रेशनिंग ऑनलाईन झालेले नाही, ऑनलाईन नसल्याने मशीनमध्ये पावती निघत नाही, त्यामुळे लाभार्थी असूनही धान्य देता येत नाही. ऑनलाईन व पॉस मशीनमुळे दुकानदारांना देखील मनस्ताप होत असून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते असे अनेक दुकानदारांनी सांगितले. 
वास्तविक पाहता नागरिकांनी रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी दुकानदाराच्या सांगण्यानुसार आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड आदिंच्या झेरॉक्सकॉपी व फोटो एक नव्हे 3-4 वेळा देऊनही रेशन कार्ड ऑनलाईन झाले नाही. यामध्ये नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. लग्न झाल्यावर मुलींचे नाव रितसर कमी केले, तसेच बाहेरगावी नोकरी कामानिमित्त गेलेल्यांनी रितसर अर्ज करून नाव ट्रान्सफर केले, तरी रजिस्टरवर अशा नोंदी झालेल्या आहेत. मात्र ऑनलाईनमध्ये तसे दाखवत नसल्याने दुकानदार धान्य देत नाही, तसेच इतर कामासाठी अशा चुकांमुळे रेशन कार्डाचा उपयोग होत नाही. 

जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी
जामखेडच्या तहसील व पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना कोणत्याही स्वरूपाच्या माहितीची विचारणा केली असता, ते वरूनच आहे असे बेजबाबदार उत्तर देऊन जवाबदारी झटकून मोकळे होतात. भर उन्हात नागरिक हेलपाटे मारून-मारून थकतात, मात्र आधिकार्‍यांना घाम फूटत नाही. गेल्या दोन महिन्यांपासून धान्य न मिळालेल्या लाभार्थींना धान्य वाटप करण्यात यावे, मशीनमध्ये अडचण येत असल्यास पावती पध्दतीने धान्याचे वाटप करण्यात यावे, गोरगरिब सामान्य नागरिकच मोठ्या प्रमाणावर रेशनिंगचे लाभार्थी असून त्यांना दर महिन्याला धान्य मिळावे, वृद्ध व्यक्तींना, अंत्योदय रेशन लाभार्थींना पुर्वीप्रमाणे धान्य मिळावे, सध्या रमजान महिना असल्याने लाभार्थी मुस्लिम बांधवांना धान्य मिळावे अशी नागरिकांची मागणी आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याबाबत तहसील प्रशासनाने गंभीरपणे दखल घ्यावी अन्यथा नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये.