Breaking News

‘पीएमएसबीवाय’अंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ४५ हजार ११५ विमाधारक


नवी दिल्ली : देशातील गरीब जनतेला अत्यल्प दरात अपघात विमा देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत’ (पीएमएसबीवाय) आतापर्यंत देशातील उद्दिष्टित १६ हजार ८५० खेडयांमध्ये २६ लाख ११ हजार ७८७ विमाधारकांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रातील उद्दिष्टित १९२ खेडयांमध्ये ४५ हजार ११५ विमा धारकांची नोंद झाली आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वतीने देशातील गोर-गरीब जनतेला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानल्या जाणारी ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ १ जून २०१५ पासून सुरु करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे उद्घाटन केले. योजनेनुसार वार्षिक १२ रूपये इतका प्रीमिअम असून अपघाती मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबियांस २ लाख रूपये किंवा अपघातात दुखापत झाल्यास उपचारासाठी १ लाख रूपये देण्यात येतात. बँक खाते असणारी १८ ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेस पात्र ठरते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या ग्राम स्वराज विभागाच्या वतीने या योजनेची अंमलबजाणी सुरु असून मागास खेड्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. आजपर्यंत देशभरातील उद्दिष्टित २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील १६ हजार ८५० खेड्यांमधे या योजनेच्या माध्यमातून २६ लाख ११ हजार ७८७ लोकांचा विमा उतरविण्यात आला आहे.