महापालिका ’स्थायी’चे अधिनियम रद्द करण्याची मागणी
सोलापूर,- महापालिकेचे नगरसचिव पी.पी. दंतकाळे यांच्यानुसार स्थायी समितीचा कारभार हा कायद्यानुसार नाही तर प्रथेनुसार चालतो. त्यामुळे समितीच्या कामकाजासाठी असलेले अधिनियम रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करावी, असा प्रस्ताव एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी महापालिका सभेकडे पाठविला आहे. अधिनियम रद्द करण्याचा प्रस्ताव आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेतील स्थायी समिती सभापती निवडीची प्रक्रिया सध्या न्यायप्रविष्ठ आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी न्यायप्रविष्ठ बाब निर्माण झाली तर सभा बोलावण्यासाठी काय करावे लागते ? महापौर देतील त्या तारखेस सभा बोलावण्याची तरतूद अधिनियमात आहे, तशी तरतूद स्थायी समितीबाबत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी दंतकाळे यांनी, सभापती बोलावतील त्या दिवशी सभा काढली जाते व ही गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्यानुसारच आताही सभापती सांगतील त्यादिवशी सभा काढण्याची प्रथा सुरु आहे, प्रथेनुसारच समितीचे कामकाज चालते’ असे उत्तर दिले होते. दंतकाळे यांनी दिलेले उत्तर इतिवृत्तात’ नोंद करण्यात आली आहे. महापालिके च्या सर्वोच्च सभागृहात जबाबदार अधिकार्याने दिलेले उत्तर पाहता, सोलापूर महापालिकेसाठी कायद्याची गरज नाही. त्याऐवजी प्रथापरंपरेनुसारच येथील कारभार चालावा, अशी स्थिती आहे. त्यामुळे किमान सोलापूर महापालिकेसाठीचे अधिनियम रद्द करावेत, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. एमआयएमचे रियाज खरादी व गाझी जहागिरदार यांनी हा प्रस्ताव दिला आहे.