Breaking News

पुणे: व्यापार्‍याचा गळा आवळून खून

पुणे  - पिंपरीतील प्रसिद्ध साबण व्यापार्‍याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. प्रदीप हिंगोरानी (वय 52, रा. पिंपरी मार्केट, डी ब्लॉक, पिंपरी) असे खून झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप हे पिंपरीमधील साबणाचे होलसेल व्यापारी आहेत. त्यांच्या घरी त्यांची आई आणि ते असे दोघेच राहतात. सकाळी सातच्या सुमारास घरकाम करणारी मोलकरीण घरी आली. त्यावेळी प्रदीप यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. मोलकरणीने घरात बघितले असता प्रदीप यांच्या आई घरातील समोरच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. मोलकरणीने घरात न जाता शेजारच्या लोकांना याबाबत सांगितले. शेजा-यांनी घरात बघितले असता, प्रदीप स्वयंपाक घरात मृतावस्थेत पडलेले आढळून आले. त्यांचा गळा आवळून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.