Breaking News

कृषी विभागाचे ‘ते’ परिपत्रक अन्यायकारक : तनपुरे


राहुरी तालुका प्रतिनिधी - कृषी विभागाने चालु हंगामात कपाशीची बियाणे दि. २० जूनपर्यंत विक्री करण्यास मनाई केल्याचे परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक पूर्णपणे चुकीचे असून जिल्ह्यातील बागायत भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे, असा आरोप माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी केला. ते म्हणाले, कृषी विभागाच्या या परिपत्रकानुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दि. २० जूननंतर कपाशी लागवड केल्यास शेतकऱ्यांचे पुढील पिकांचे नियोजन कोलमडून कोणतेही पिक हाती लागणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल. जिल्ह्यात विशेषतः बागायती भागात कपाशीची लागवड ही दरवर्षी अक्षय तृतीयेला केली जाते. तत्पूर्वी महीना ते पंधरा दिवस आधी कपाशीचे बियाणे बाजारपेठेत उपलब्ध होत असते. त्यानंतर साधारणतः अक्षय तृतीयेला कपाशी लागवड सुरु होते. याच वेळेत केलेली कपाशी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरत असते. पण मागील वर्षी कपाशीवर पडलेल्या बोंड अळीमुळे आणि यावर्षीचे वाढलेले उच्चांकी तापमान यामुळे कपाशी लागवड उशिरा करणे गरजेचे होते. त्यासाठी १० ते १५ दिवस उशीरा लागवड करण्याचे नियोजन केले आहे. पण शासनाच्या कृषी विभागाने परिपत्रक काढून एक प्रकारे कपाशी लागवडी करण्यास दि. २० जूनपर्यंत बंदी घातली आहे. अर्थात ती पूर्णपणे चुकीची व शेतकरी विरोधी आहे. कृषि विभागाने सदरचे परिपत्रक मागे घेऊन नगर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यास कपाशीचे बियाणे त्वरित उपलब्ध करून द्यावे. राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदाना पोटी १७ कोटी रूपये भरपाई जाहीर होऊनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर सदर रक्कम वर्ग झाली नाही. हे अनुदान कधी वर्ग करणार, असा सवाल तनपुरे यांनी यावेळी बोलताना केला.