Breaking News

तनपुरे यांच्या बंगल्यात धाडसी चोरी सव्वा लाखांचे दागिने लंपास

राहुरी प्रतिनिधी - येथील बापूसाहेब तनपूरे यांच्या राहत्या बंगल्यातून चोरटय़ांनी सुमारे सव्वा लाख रुपयांच्या सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेले. या घटनेमुळे परिसरात भिती आणि काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राहुरी शहर हद्दीतील तनपूरेवाडी रोड परिसरातील बापूसाहेब रंगनाथ तनपूरे यांच्या ‘श्रीहरी’ बंगल्याचे काल {दि. २०} रात्री बारा ते साडेतीनच्या दरम्यान चोरट्यांनी मागील बाजूच्या दाराची कडी तोडून आत प्रवेश केला. यावेळी तनपूरे कुटूंबातील सर्वजण गाढ झोपेत असल्याने कोणाला काही कळले नाही. यादरम्यान चोरट्यांनी घरातील सामानाची व कपाटाची उचकापाचक करुन सोन्याचे दोन गंठण, अंगठी व चांदीचे काही दागिणे चोरून नेले. याप्रकरणी बापूसाहेब तनपूरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांनी ‘रक्षा’ या श्वानालाबरोबर घेऊन घटनास्थळी पाहणी केली. मात्र हा श्वान जागेवरच घुटमळल्याने पोलिसांना चोरट्यांचा काहीच सुगावा लागला नाही. 

दरम्यान, स्टेशनरोड परिसरातील मेहेत्रे मळा येथे राहत असलेले सनी गुलदगड यांच्या घरात पाच चोरट्यांनी कडीकोंडा तोडून घरात घूसण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील कुत्री भुंकल्याने गुलदगड कुटूंबीय जागे झाले. परिणामी चोरट्यांना तेथून हात हलवित परतावे लागले. याच चोरट्यांनी बापूसाहेब तनपूरे यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळविला. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव हे करीत आहेत.