कोपरगाव शहर वार्तापत्र / संजय भवर नगरपालिकेत सत्तांतरानंतर आरोप-प्रत्यारोपांचेच पर्व!
पूर्वीच्या काळी नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होती. परंतु नगरपालिकेत सत्तांतरानंतर राजकीय मंडळींसह प्रशासकीय अधिकारीही आरोपाच्या फैरी झाडत आहेत. नगराध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोपप्रत्यारोपाचा फटका मात्र शहरातील नागरिकांना विनाकारण बसत आहे.अनेक दिवसांपासून शहरातील विकासकामे कामे ठप्प झालेली आहेत. नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किटकनाशक पावडर आणि धूर फवारणी झालेली नाही. येथील रस्ते खराब झाल्याने खरेदीसाठी येणारे ग्राहक जवळच्या येवला, संगमनेर, नाशिक आदी शहराच्या
बाजारपेठेचा रस्ता धरू लागले आहेत. चुकून काही ग्राहक कोपरगावला आलेच तर त्यांना वाहन पार्किंगची समस्या भेडसावते. नगरपालिकेने जे पार्किंग झोन तयार केले आहे, त्या जागेवर छोट्या छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करुन त्या जागा हडप केल्या आहेत. त्यामुळे वाहन पार्किंग समस्या उदभवली आहे. नाइलाजास्तव वाहनधारकांना वेगवगळ्या गल्लीबोळातील जागांचा वाहन पार्किंगसाठी आधार घ्यावा लागत आहे. त्यात आडवळनाच्या जागेत वाहन पार्किंग केल्यास भुरटे चोर लॉक तोडून वाहनातील सामानावर ताव मारून घेतात, ही समस्या वेगळीच. त्यामुळे शहरातील मोकळ्या जागेत ‘पे अँड पार्क’ची संकल्पना राबवावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने शहरात नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे या नवीन पाइपलाईनसाठी रस्त्याची खोदाई करून पाईप टाकण्यात आले खरे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे रस्ते व्यवस्थितपणे बुजविण्यात न आल्यामुळे सर्वच रस्ते खड्डमेय झाले आहेत. नवीन पाणीपुरवठा करण्यासाठी मीटर जोडून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर नळकनेक्शनसाठी नवीन मीटर बसविण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु त्याचा खर्च नगरपालिका करणार की जनतेवर भार टाकला जाणार, हेदेखील नगरपालिकेने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
नगरपालिकेने अनेक वर्षांपासून लाखो रुपये खर्चून जलतरण तलाव तयार केला आहे. परंतु श्रेयवादामुळे त्याचे उदघाटन लांबत आहे. ऐन उन्हाळयात अंगाची लाही लाही होत असतांना किमान या उन्हाळयात तरी जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करण्याची मागणी होत आहे. शहरातील बाजारतळ येथे आठवडा बाजार भरत आहे. नागरिकांची व बाजारकरुंची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे साहजिकच जागा पुरत नाही. शेतकरी व व्यापारी आपली दुकाने रस्त्यावर व लहान पुलाच्या बाजूने थाटून वाहतुकीला अडथळा करत आहेत. त्याला पर्याय म्हणून लवकरच मोठ्या जागेत बाजार तळाची निर्मिती करण्याची मागणी जनतेतून होत आहे. शहरात बाहेरगावहून आलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन व्हावे, यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. नगरपालिकेचे खुले नाटयगृह हे जुने झालेले असून त्यात बसण्यासाठी व कलाकारांना कला सादर करण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. तसेच शहरात क्रिडाप्रेमी व खेळाडूंसाठी सुसज्य असे क्रिडांगण असावे, अशी क्रिडापटू आणि क्रिडाप्रेमींची अपेक्षा आहे. शहरात वाहनधारकांची संख्या वाढत चालली आहे. परंतु अधिकृत परवाना असलेल्या वाहनधारकांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे अल्पवयीन विध्यार्थी बेभान होत भरधाव वेगात वाहने दामटवित आहेत. परिणामी शहरासह तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. वाहतूक नियंत्रणासाठी शहरातील चौकाचौकांत स्वयंचलित सिग्नल बसवून त्याठिकाणी वाहतूक पोलिस नेमलयास वेगावर नियंत्रण होऊन अपघाताचे प्रमाण कमी होईल.