Breaking News

नाशिक विधान परिषदे निवडणुकीसाठी जिल्ह्यात 15 मतदान केंद्र


नाशिक, दि. 10, मे - नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 15 मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील एका उपजिल्हाधिकार्यांंच्या दालनासह 14 तहसील कार्यालयांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. बॅलेट पेपरची विशिष्ट पद्धतीने घडी करणे, निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणार्या जांभळ्या शाईच्या पेनानेच पसंतीक्रम टाक णे मतदारांना बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

विधान परिषद निवडणुकीसाठी 7 मे रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी सहाणे यांच्यासह अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांच्यात तिरंगी लढत स्पष्ट झाली आहे.मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. या निवडणुकीतही मतदारांना नोटाचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे एकही उमेदवार पसंत नसेल तर मतदार नोटाच्या पर्यायाचा अवलंब करू शकणार आहेत.

21 मे रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून मतपेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा कोषागार विभागात स्ट्राँग रूमची व्यवस्था केली जाणार आहे. 24 मे रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून साडेसहा वाजताच उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील मतमोजणी कक्षात आणण्यात येणार आहेत. मोजणीसाठी दोन टेबलची व्यवस्था करण्यात येणार असून प्रत्येक उमेदवाराला टेबलजवळ एक प्रतिनिधी ठेवता येणार आहे. मतपत्रिकेची विशिष्ट पद्धतीने घडी करावी लागणार असून, त्यावर जांभळ्या शाईच्या पेनानेच पसंती क्रम लिहिणे अनिवार्य आहे. मतदान स्थळी निवडणूक आयोगाकडून हा पेन उपलब्ध करून दिला जाईल. मतदान केंद्रांवरून प्राप्त होणार्या सर्व मतदारांच्या चिठ्ठ्या मतमोजणी कक्षामध्ये एकत्रित केल्या जातील. या चिठ्ठ्यांचे गठ्ठे बांधले जातील, त्यानंतर मतांची मोजणी केली जाणार आहे.

निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. मतदान तसेच मतमोजणी प्रक्रिया नेमकी कशी असेल, याबाबत त्यांना माहिती देण्यात आली. तसेच निवडणूक आयोगाकडून याबाबतच्या प्राप्त सूचनाही त्यांना सांगण्यात आला. मतदान केंद्रात मोबाईल तसेच पेन घेऊन जाण्यास उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच मतदारांना निर्बंध घालण्यात आले आहेत. असेच निर्बंध मतदान केंद्रात तसेच मतमोजणी कक्षात कर्तव्यावर असलेल्या सरकारी अधिकारी, कर्मचार्यांना घातले जाणार का अशी विचारणा काही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्यांना केली. त्यांच्यावरही निर्बंध घालू असे निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून सांगण्यात आले. परंतु तोंडी न सांगता हे लेखी द्यावे अशी मागणी प्रतिनिधींकडून करण्यात आली. परंतु लेखी देता येणार नाही असे सांगत त्यांची बोळवण करण्यात आली.