Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचे पाय करवतीने कापून निषेध.


अहमदनगर - सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व दूध उत्पादक शेतकर्‍यांना जाहिर केलेले हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने दिल्लीगेट समोर गनिमी कावा तंत्राची गुढी उभारुन, शेतकरी संरक्षण कायद्याचे प्रस्ताव पूजन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक दगडाला दुधाचा अभिषेक घालून, त्या खुर्चीचे पाय करवतीने कापण्यात आले. खुर्चीचे पाय कापल्याने दगड खाली कोसळताच आंदोलकांनी सरकार विरोधी जोरदार घोषणा दिल्या. शेतकरी विरोधी धोरण राबविल्याने गनिमी कावा तंत्राने सत्ताधार्‍यांना खुर्चीतून पायउतार करण्याचा सुचक इशारा आंदोलकांनी दिला.प्रारंभी शेतकर्‍यांचे नेते कृषी कुलनायक महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करुन, कॉ.बाबा आरगडे व गुलाबराव डेरे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. 

दूध धंद्याला नवसंजीवनी प्राप्त होण्यासाठी दूधाला चांगला भाव व ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळण्याची मागणी करीत नागरिकांना दूधाचे वाटप करण्यात आले. या आंदोलनात अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, रईस शेख, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, अशोक भोसले आदिंसह दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
 
राज्यातील शेतकरी अडाणी, अशिक्षित असंघटीत आणि आर्थिकदृष्ट्या दुबळा आहे. सत्ताधारी सरकार शेतकर्‍यांचा विचार करत नसल्याने शेतकरी गनिमी काव्याचा मार्ग अवलंबणार आहे. याद्वारे यापुढील निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा पराभाव होणार आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांना राज्य सरकारने जाहिर केलेले 27 रु. प्रती लीटरचा दर मिळत नसून, त्यांना प्रत्यक्षात 17 रु. दर मिळतो. दूध भेसळीने एका टँकरचे तीन टँकर केले जात असताना ग्राहकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या जीवावर डेअरीमालक कोट्याधीश झाले. मात्र दूध उत्पादक शेतकर्‍याला त्याचा श्रमाचा मोबदला मिळत नसल्याची खंत अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी व्यक्त केली. 
 
निसगार्र्च्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांना संकटाला तोंड द्यावे लागते. निर्सगाने साथ दिल्यास पिकांना उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळाल्याने मोठे नुकसान होते. या नुकसानातून सावरण्यासाठी तो बँकाकडून कर्ज घेतो. बँकाकडून वेळेवर कर्ज न मिळाल्यास सावकाराकडून कर्ज घेवून त्याच्या कर्जाच्या बोज्याखाली अडकतो व शेवटी आत्महत्येचा मार्ग पत्कारतो. शेतकर्‍यांना जगविण्यासाठी व त्यांना चांगले दिवस आनण्यासाठी शेतकरी संरक्षण कायद्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.