स्मार्ट सिटी- क्लीन सिटी संकल्पनेबरोबर 'ग्रीन सिटी' संकल्पना अंमलात आणण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
हरित शहरांच्या निर्मितीमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी योगदान द्यावे, गृहनिर्माण सोसायट्यांची कामे करताना परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, वन हा विषय कुठल्याही कायद्याच्या चौकटीत न अडकवता अधिकाधिक लोकांना हे काम स्वत:च्या जीवनासाठी महत्त्वाचे वाटले पाहिजे. हा वन सत्याग्रह आपला आणि राज्याच्या अभिमानाचा विषय वाटला पाहिजे, अशी भावना आपण निर्माण करत आहोत. म्हणूनच राज्यात महावृक्ष लागवड हा केवळ शासनाचा उपक्रम राहिला नाही, ती आता लोकचळवळ झाली आहे. पहिल्या वर्षी एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प २ कोटी ८१ लाख रोपं लावून पूर्णत्वाला गेला तर दुसऱ्या वर्षीच्या ४ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची ५ कोटी ४३ लाख रोपं लावून पूर्तता झाली. लोकांनी वृक्ष लागवडीचा लोकोत्सव साजरा केला. या दोन्ही वर्षांच्या वृक्ष लागवडीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
