Breaking News

शेतकर्‍यांनी शेतात काय भाजपचे झेंडे पेरावे का ? : आ.बच्चू कडू

खामगाव : कर्जमाफीचा लाभ अद्याप शेतकर्‍यांना मिळाला नाही, पीक कर्जही मिळेनासे झाले आहे. आता पेरणीचे दिवस तोंडावर येत असतानाही शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत. हे पैसे पेरणीपूर्वी न मिळाल्यास शेतकर्‍यांनी आपल्या शेतात भाजपचे झेंडे पेरावेत का? असा उपरोधिक सवाल प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी केला. शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग, निराधार व बेरोगाराच्या हक्कासाठी आ. कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते भोकरदन पर्यंत आसुड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी ही यात्रा खामगाव शहरात दाखल झाली. शहरातील प्रमुख मार्गाने निघून आ. कडू यांनी पत्रकार भवनामध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला. आ. कडू यांनी भाजप व विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले राष्ट्रवादी-काँग्रेस पक्ष सत्तेत असताना स्वामिनाथन आयोग लागू केला नाही. आणि आता हल्लाबोल करुन खोटी आसवे गाळत आहेत. काँग्रेसने हल्लाबोल यात्रेदम्यान शेतकर्‍यांची जाहीर माफी मागायला हवी होती, परंतु त्यांनी तसे केले नाही. सत्तेत येण्यापुर्वी भाजपाचे नेते आमचा एक सैनिक शहीद झाल्यास त्यांचे दोन मारु अशी भाषा करीत होते. परंतु आता आमच्या शेतकर्‍यांच्या जीवावर उठून पाकिस्तानची साखर भाजपाने आयात केली आहे. शेतमालाला भाव देण्याऐवजी परदेशातून शेतमाल आयात करण्याचे धोरण भाजप सरकारचे आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
कृषीमंत्र्यांच्या बुलडाणा जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र सुरु आहे. विदर्भातील शेतकर्‍यांना गारपीट, बोंडअळीसह इतर नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही. पेरणीआधी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास कृषीमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसून आंदोलन करु असा, इशारा आ. कडू यांनी दिला. आगामी विधानसभा निवडणूकीत ज्या ठिकाणी प्रहार संघटना मजबूत आहे अशा जागा लढवणार असल्याचे आ. कडू म्हणाले.