Breaking News

नाशकात पैशांचा पाऊस पाडणार्‍या टोळीसह दोन मांत्रिक पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : आडगाव शिवारात पैशांचा पाऊस पाडणार्‍या टोन मांत्रिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. औरंगाबाद रोड येथील देव मोटर्स येथे मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, एका महिलेला काही पैशांची गरज होती. या महिलेने नाशिक येथील परिचित प्रमोद सूर्यवंशी याच्याकडे आठ दिवसांपूर्वी पैशाची अडचण असल्याचे सांगितले. तेव्हा सूर्यवंशी याने आपल्या ओळखीतला मांत्रिक असून तो पैशांचा पाऊस पाडतो असल्याचे सांगितले. पूजेच्या वेळी देवी म्हणून एका बालिकेला बसवावे लागते तर या कामाचे तो 60 हजार रुपये घेतो असेही सांगितले. महिलेला पैशांची गरज असल्यामुळे ती या मुलीला घेऊन औरंगाबाद रोड येथे आली तिने सूर्यवंशीकडे तीन हजार रुपये दिले. बाकीचे पैसे नंतर देते असे सांगून गुरूवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सर्व पूजा मांडून मंत्रोच्चार सुरु करण्यात आला. यावेळी अचानक आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी व त्यांच्या पथकाने औरंगाबाद रोड येथील देव मोटर्स येथे छापा टाकला. यात सुधीर भोसले, चंद्रकांत जेजुरकर, तुषार चौधरी यांच्यासह मांत्रिक संदीप वाकडे, मांत्रिक निखील या दोन्ही मांत्रिकाविरोधात जादूटोणा विरोधी कायदा व भारतीय दंड विधान संहिता अन्वये पैशांचा पाऊस पाडणे, फसवणूक करणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका 
आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका. पैशांचा पाऊस वगैरे कधीच पडत नसतो. पैसे उकळविण्यासाठी काहीही करू शकतात. जर असे कृत्य करताना कुणी आढळले तर पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन नाशिकच्या पोलिसांनी केले आहे.