Breaking News

लग्नसराईमुळे कलाकुसर जपणार्‍या व्यवसायांना तेजी


कुळधरण : लग्नसराई जोरात सुरु आहे. त्यामुळे या समारंभाशी निगडित व्यवसाय तेजीत आहेत. पारंपरिक व्यवसाय करीत उदरनिर्वाह करणार्‍या कलावंतांना लग्नसराईमुळे चांगले दिवस आहेत. समारंभातील स्टेज सजावट, बॅनर, थर्माकॉल आर्ट, मेहेंदी, मेकअप, वेशभूषा असे अनेक व्यवसाय तेजीत आहेत.

थर्माकॉलवर रंगसंगतीत मजकूर लिहुन समारंभस्थळी प्रदर्शित करण्याची प्रथाच बनली आहे. स्टेजवर वधु-वर यांची नावे आडनावे लावुन पुष्पहारांनी सजावट केली जाते. आवड मला जीची मी तिलाच आणलं, लेक तुमची लक्ष्मी आमची, हे बंध रेशमाचे, दुल्हन हम ले जायेंगे, रब ने बनादी जोडी, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मेरे यार की शादी है अशा आशयाचे कित्येक बोर्ड आवडीनुसार बनवुन लावले जातात. लग्न समारंभ आयुष्यातील अत्यंत संस्मरणीय समारंभ असल्याने मोठा खर्च करुन दिमाखात आयोजन केले जाते. या समारंभासाठी कला जोपासणार्‍या व्यावसायिकांचे विशेष महत्व असते. वधुचे मेकअप, मेहेंदी काढणे, वेशभूषा करणे, रुखवत बनविणे यासारख्या कामात महिलांचेही योगदान असते.

थर्माकॉलपासुन डेकोरेशन बनविण्याची कला अप्रतिम आहे.त्यापासून डेकोरेशन करुन घेण्याचा बहुतांशी कल दिसुन येतो.त्यामुळे अशा कलावंतांना या काळात चांगले काम मिळते. दिवाळी तसेच उन्हाळ्यातील लग्न सराईत त्यांच्या चरितार्थाला हातभार लागतो. मात्र वेळ, कला व श्रमाच्या तुलनेत अर्थार्जन होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.


कलेची आवड असल्याने व्यवसायाची निवड20 वर्षापासुन डेकोरेशन व पेंटिंगची कामे करतो. लग्नसराईत थर्माकॉलचे काम अधिक असते. साईझ व मजकूरानुसार 50 रुपयांपासुन 120 रुपयांपर्यंत एक पिस तयार करुन दिला जातो. या कामाला अधिक वेळ लागतो. त्यामुळे दिवसभराची 200 ते 250 एवढीच मजुरी मिळते. 2 एकर कोरडवाहू जमिन असल्याने त्यातुन काहीच उत्पन्न मिळत नाही. कलेची आवड असल्याने उदरनिर्वाहासाठी हे क्षेत्र निवडले आहे. बाहेरची पेंटिंग कामे, गणपती बनविणे अशी कामेही करतो. त्यात पत्नी व मुले मदत करतात. मुलाने या व्यवसायात न येता शिकुन मोठे व्हावे असे मनापासून वाटते.