Breaking News

आंनदवाडीला घरफोडी; जायभाय जबर जखमी


जामखेड : तालुक्यातील खर्ड्याकडे जाणार्‍या हमरस्त्यावरील आंनदवाडी येथे महादेव जायभाय यांची घरफोडी केली, चोरांचा प्रतिकार करताना जायभाय जबर जखमी झाले. या संदर्भात जामखेड पोलिस स्टेशनला शाम काळेसह दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातही नागरिक भितीच्या सावटाखाली राहत आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्याच मतदारसंघात अशा घटना का घडतात अशी उलट सुलट चर्चा तालुक्यात सुरू आहे.

बुधवारी जायभाय दाम्पत्य जेवन करून स्लॅबवर झोपले, त्यानंतर 1.30 वाजता जायभाय बोअरची मोटार चालू करण्यासाठी उठले व खाली उतरले, त्यावेळेस त्यांचे घराचे कुलूप तोडून तीघेजण घरातील कपाट चोरून घेऊन जाताना दिसले, त्यावेळी त्यातील एका चोरट्याने दिसताच दगड फेकून मारला तो दगड त्यांच्या डावे बरगडीला लागल्याने त्यांना दुखापत झाली, त्यांना मारहाण करताना जायभाय जोरात ओरडले असता आजुबाजूचे नागरिक जागे होऊन त्यांच्या घराकडे धावले. सर्व आल्यानंतर सर्वांनी मिळून ते पळालेल्या नामदेव सांगळे यांचे विहीरीकडे त्यांचे पाठलाग केले. त्यातील एकजण शाम दादा काळे राहणार आंनदवाडी हा चोरटा आरोपी त्यांना सापडला. इतर दोघे चोरट्यांनी पोबारा केला, त्यानंतर काल नगरहुन डॉग श्‍वान पथक पोहचले.

दोन महिन्यांपूर्वी डॉ. सादीक शेख व कय्युम शेख यांच्या वर भरदिवसा पंचायत समिति समोर गोळीबार झाला, तसेच 28 एप्रिल रोजी राकेश राळेभात व योगेश राळेभात यांच्यावर बीड रस्त्यावर भरदिवसा गोळीबार करून हत्या केली हे प्रकरण ताजे असतानाच दोन दिवसापुर्वी जामखेड खर्डा रोडवर आंनदवाडी शिवारातच भर दिवसा ट्रक चालकास आडवून बेदम मारहाण करत ड्रायव्हर जवळील पैशाची लुट करण्यात आली. तीन महिण्यापुर्वी याच आंनदवाडी शिवारात इंडिका गाडी अडवून प्रवाश्यांना जबर मारहाण करत लुटण्यात आले. दोन वर्षापुर्वी येथेच लक्झरी लुटण्यात आली होती. या घटना याच आंनदवाडी शिवारात का घडतात? असा सवाल प्रवाशी व नागरिकांमधून होत आहे. 

पुन्हा एकदा गुन्हेगारी दहशतीचा थरार शांत होतो ना होतो तोच, काल रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील आंनदवाडी येथील महादेव धोंडिबा जायभाय यांच्या घरावर आंनदवाडी गावातीलच शाम दादा काळे व इतर दोन अज्ञात इसमाने जायभाय यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाट चोरून उचलून घेऊन जात असताना जायभाय यांनी त्यांना पाहिले असता, त्यांना दगड मारून जखमी केले व कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले तसेच त्यातील आरोपी क्र. 1 हा मिळून आला आहे, अशा आशयाची फिर्याद फिर्यादी महादेव धोंडिबा जायभाय यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिली असुन 40 हजार रूपये रोख व सोन्याचे दागिने त्यात एक नेकलेस एक तोळा, गंठन एक तोळा, अंगठी एक तोळा चोरी गेल्याचे आपल्या फिर्यादीत नमुद केले आहे. या संबंधी पुढील तपास जामखेड पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नामदेव सहारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल भिताडे हे करत आहेत. परंतु जामखेड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.