पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
२०९७ केंद्रांपैकी 14 केंद्रांना क्रिटिकल असे नमूद करण्यात आले असून यामध्ये या केंद्रांकडे शासकीय यंत्रणेचे अधिक लक्ष राहणार असल्याचेही डॉ. नारनवरे यांनी सांगितले.पालघर लोकसभा क्षेत्रातील डहाणू विधानसभा क्षेत्रात327, विक्रमगडमध्ये 328, पालघरमध्ये 318, बोईसरमध्ये 338, नालासोपारामध्ये 449 तर वसई विधानसभा क्षेत्रात 327 मतदान केंद्र आहेत. यापैकी डहाणू मधील पतीलपाडा(63), बोईसर मधील बोईसर(34), धोंडीपूजा (85), खैरपडा (294) तसेच वळीव मधील तीन केंद्र, नालासोपारा विधानसभा क्षेत्रात निळेमोरे येथील पाच आणि आचोळे येथील दोन अशी एकूण 14 केंद्र क्रिटिकल घोषित करण्यात आली आहेत.मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 9 उपविभागीय पोलीस अधिकारी, 18पोलीस निरीक्षक, 182 पोलीस उपनिरीक्षक, दोन हजार 602 पोलीस शिपाई, 495 नवीन भरती झालेले पोलीस,एक हजार 117 होमगार्ड व 46 नागरी सुरक्षा विभागाचे स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. मतदानासाठी दोन हजार 737 मतदान केंद्र अध्यक्ष, सात हजार 737 मतदान अधिकारी व दोन हजार 308 शिपाई यांचा फौज फाटा कार्यरत राहणार आहे.
सर्व मतदारांना 2097 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेमार्फत मतदार चिठ्ठयांचे ( Voter Slip) वाटप करण्यात येत आहे. मतदान झाल्यानंतर EVM व VVPAT मशिन संबधित विधानसभा मतदारसंघ मुख्यालयाच्या स्ट्राँग रुममध्ये जमा करण्यात येतील व त्यांनतर कडक पोलिस बंदोबस्तामध्ये सदर मशीन पालघर येथील सूर्या कॉलनीमधील जिल्हा स्ट्राँग रुममध्ये जमा करण्यात येतील.
31 मे रोजी पालघर येथे होणाऱ्या मतमोजणीला सहा विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी 14 असे एकूण 84 मोजणी टेबल मांडण्यात येणार आहेत. या प्रत्येक टेबल वर सुपरवायझर, सहाय्यक व मायक्रो ऑब्झर्व्हर तसेच त्यांच्या जोडीला समन्वय साधणारे, डेटा एन्ट्री कर्मचारी असे सुमारे 600 अधिकारी - कर्मचारी कार्यरत राहतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिली.