Breaking News

भरदिवसा आनंदवाडी शिवारात रोडवर ट्रकचालकास लुटमार

जामखेड तालुक्यातील आंनदवाडी शिवारात भरदिवसा रोडवर लुटमारिची घटना उघडकीस आल्याने पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जामखेड तालुक्यात या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. याच शिवारात तीन महिन्यांपुर्वी इंडिका गाडी लुटण्यात आली होती, तसेच दोन वर्षांपूर्वी लक्झरी बस अडवून प्रवाशांना मारहाण करून त्यांचेकडील सोने व रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला होता. अशा घटना वारंवार आंनदवाडी शिवारातच का घडतात अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे, नागरिक दिवसा खर्डा रस्त्याने जायला देखील घाबरत आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अजिबात राहिलीच नाही. जामखेड आता बिहार झाले आहे. दिवसा लोक गोळ्या झाडतात दोन महिन्यात दोनदा गोळीबार झाला, जामखेडमध्ये कोणाचा कोणास धाकच राहिला नाही. 


शिडी - हैदराबाद महामार्गवरील आंनदवाडी शिवारात भरदिवसा ट्रक लुटन्याची घटना काल (7) रोजी भरदिवसा घडली. याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन एकास अटक करण्यात आले आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील आंनदवाडी शिवारात आंध्रप्रदेश च्या मालवाहू चालकाला दमबाजी करून लुटले, पोलिसांनी तात्काळ एकास अटक करून पाच ते सहा जणांविरूद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
उडोरलु बालचन्नाया (28) रा. कडप्पा आंध्रप्रदेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालवाहतूक ट्रक आंध्रप्रदेशमधुन फरशीचा माल भरून जामखेड मार्गे पुण्याला जात होता, दुपारी ड्रायव्हरने आंनदवाडी शिवारात एका झाडाखाली गाडी थांबवली. चाकातील हवा तपासत असताना शेतातून काही पाच ते सहा जण आले व कोणत्या गाडीला अपघात करून आला असे खोटे बोलुन क्लिनर व ड्रायव्हरला मारहाण सुरू केली. गाडीची उचकापाचक करून फिर्यादीच्या खिशातून तीन हजार रुपये काढुन आणखी मारहाण चालु असताना आंनदवाडी गावच्या काही लोकांनी मोटारसायकल वरून जात असताना हा प्रकार पाहून त्यांची सुटका केली. त्याच दरम्यान पोलीसांची गाडी खर्डाकडे जात असताना घडलेल्या प्रकाराची माहिती घेत एक आरोपी बालाजी श्रीरंग वैराग रा. वैराग रस्ता मोहळ जि. सोलापूर यास तात्काळ ताब्यात घेतले असून बाकीचे आरोपी जामखेडमधील असल्याचे समजते. घटनास्थळी उपाधिक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी भेट देवून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करीत आहेत.