Breaking News

‘आयुषमान भारत’ योजना राबवा : भाजपची मागणी


संगमनेर भाजप सरकारच्या जनकल्याणकारी ‘आयुषमान भारत’ अर्थात मोफत वैद्यकीय विमा योजनेची संगमनेर शहरात त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी संगमनेर शहर भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे.


केंद्रातील भाजप सरकारने ‘आयुषमान भारत’ ही अत्यंत जनोपयोगी योजना आणली आहे. सन २०११ च्या ‘सामाजिक जनगणना’ यादीतील संकलित माहितीनुसार या योजनेचे लाभार्थी निवडण्यात आलेले आहेत. या योजनेंतर्गत निवडलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा प्रती वर्ष पाच लाख रुपयाचा वैद्यकीय विमा (मेडिक्लेम) केंद्र सरकार उतरवणार आहे. आजारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर उपचाराचा पाच लाख रुपये मर्यादेपर्यंत खर्च केंद्र सरकार करणार आहे. ही योजना संगमनेर शहरात त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी भाजप शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करून पाठपुरावा केला. या योजनेत समाविष्ट लाभार्थी कुटुंब यादी तसेच समाविष्ट असलेले आजार, हॉस्पिटल्स, नियम व अटींबाबत नागरिकांना नगरपरिषद येथून माहिती मिळेल. सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयोगी असलेल्या या योजनेचे आवश्यक सोपस्कार करून लाभार्थी कुटुंबांची यादी त्वरित नागरिकांसाठी उपलब्ध करावी, अशी मागणी संगमनेर शहर भारतीय जनता पक्षातर्फे तहसीलदार व नगरपरिषद मुख्याधिकारी यांचेकडे निवेदन देऊन करण्यात आली.

यावेळी संगमनेर भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, शहर सरचिटणीस दिनेश सोमाणी, सुदाम ओझा, प्रसिद्धी प्रमुख शिरीष मुळे, दीपक भगत, भारत गवळी, सुनील खरे, किशोर गुप्ता, शिवकुमार भांगीरे, दीपेश ताटकर, अशोक शिंदे, दिलीप रावल, जग्गू शिंदे, राहुल भोईर, कांचन ढोरे, रेश्मा खांडरे, ज्योती भोर आदी उपस्थित होते.