Breaking News

आयपीएल मॅचवर बेटिंग करणार्‍या पाच जणांना अटक

पुणे - सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून तब्बल 12 लाख 26 हजार 160 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई पुणे ग्रामीण आणि रायगड पोलिसांनी संयुक्तपणे केली.

विक्रम वारसमल जैन (वय 39, रा. निगडी गावठाण, पुणे), नरेश रामस्वरूप अगरवाल (वय 47, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव, पुणे), नवीन बाळकृष्ण अगरवाल (वय 41, रा. मेन बझार, देहूरोड, पुणे), दीपक दौलतराम कृपलानी (वय 43, रा. जाधववाडी, चिखली, पुणे), नदीम मैमुद्दीन पठाण (वय 28, रा. आकुर्डी, पुणे) अशी अवैधरित्या आयपीएल मॅचवर बेटिंग घेणार्‍यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेण्यासाठी सोमाटणे फाटा येथून पांढर्‍या रंगाच्या स्कोडा गाडीतून (एम एच 14 एफ क्यू 5550) निघणार असल्याची माहिती एलसीबीच्या टीमला मिळाली. त्यानुसार सोमाटणे फाट्यावर पोलिसांनी लक्ष ठेवले. दरम्यान, मिळालेल्या माहितीची एक स्कोडा कारमधून पाच इसम देहूरोडकडून तळेगावच्या दिशेने जाताना आढळले.
पोलिसांनी कारचा पाठलाग केला असता, ती गाडी तळेगाव-उरसे-लोणावळा-खोपोली मार्गे खालापूर-पनवेल रोडवर ’लिला इन’ या हॉटेलसमोर थांबली व त्यातील इसम लॉजमध्ये गेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड यांच्या पथकाने रायगड पोलिसांशी संपर्क साधून रायगड पोलिसांच्या एका टीमला घटनास्थळी बोलावले. दोन्ही टीमने लॉजवर छापा मारून पाच जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांकडून 11 मोबाईल, 1 लॅपटॉप, 1 कॅल्क्युलेटर, 1 पोर्टेबल टीव्ही सेट टॉप बॉक्स, रोख रक्कम 98 हजार 460 रुपये आणि स्कोडा कार असा एकूण 12 लाख 26 हजार 160 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.