Breaking News

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने हॉटेलमालकाला दिले ‘सरप्राईज’!


शिर्डी : साईनगरी शिर्डीला ७० वर्षांपूर्वी साईभक्तांबरोबरच ग्रामस्थांना साउथ इंडियन डोसा, इडली, शिरा, उत्तपा, मेंदूवडा असे चविष्ट पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध करून देणाऱ्या रामकृष्ण अय्यर आणि स्व. चेलम्मा अय्यर यांच्या हॉटेल स्वामी मद्रासला सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी भेट दिली. या हॉटेलचे मालक विश्वनाथ रामकृष्ण अय्यर यांच्याकडे शिल्पा शिट्टीने तुमच्या हॉटेलमधील मेन्यू खाण्यासाठी मी येणार आहे, असे सांगितले. मात्र हा दौरा गुप्त ठेवण्यात आला. १० दिवसांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची आई लहान बाळासमवेत भेट देऊन गेली. मात्र तिच्या या ‘सरप्राईज’ची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये अजूनही रंगत आहे.

शिल्पा शेट्टीने शिर्डीकरांना आश्चर्यचकित करून दिले. मात्र ती येते काय, एका हॉटेलला भेट देते काय आणि आपल्याला माहिती होत नाही, तिला बघता आले नाही, याचे शल्य तिच्या चाहत्यांच्या मनात आजही ताजे आहे. दरम्यान, पुढच्या वेळी येताना पती राज कुंद्रा यांनाही घेऊन येईल. त्यावेळी पुन्हा या हॉटेलला भेट देईल, अशी ग्वाही तिने दिल्याचे हॉटेलमालक साईभक्त विश्वनाथ अय्यर व प्रसाद अय्यर व लक्ष्मी अय्यर यांनी सांगितले.