बीजिंग : परस्परांचे हित जोपासण्यासाठी भारत व चीनने संवेदनशील भूमिका घेण्याची गरज आहे. असे झाले तरच उभय देशांच्या द्विपक्षीय संबंधांची नाळ आणखी घट्ट होईल, असे आग्रही प्रतिपादन भारताचे चीनमधील राजदूत गौतम बंबावले यांनी बुधवारी केले आहे. दोन्ही देशांत लष्करी सहकार्य वाढले पाहिजे. यामुळे सीमेवरील तणाव दूर होऊन तेथे शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला आहे. . अनंत एस्पन सेंटर व चीन सुधारणा मंच यांच्यात पार पडलेल्या ८व्या भारत-चीन चर्चासत्रात बंबावले यांनी संबोधित केले. वुहानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात नुकत्याच झालेल्या 'हार्ट टू हार्ट' या अनौपचारिक दिलखुलास शिखर संमेलनाचा उल्लेख करीत ते म्हणाले की, भारत-चीनने परस्परांविषयी अतिशय संवेदनशील पवित्रा घेण्याची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय तसेच प्रादेशिक मुद्यांसह व्यूहरचनात्मक प्रश्नांवर मोदी व जिनपिंग यांच्यात स्पष्ट व स्वतंत्र चर्चा झाली आहे.