बहुचर्चित चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगवास भोगणारे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना बुधवारी पाच दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. पुत्र तेजप्रताप यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी त्यांना पॅरोल देण्यात आला आहे. त्यामुळे रांचीस्थित रिम्स रुग्णालयातून लालू पाटण्यात विमानाने दाखल होणार आहेत. सध्या लालूंच्या कुटुंबात तथा राजदच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. १० ते १४ मे असा पाच दिवसांचा लालूंना पॅरोल मिळाल्याचे राजदचे राष्ट्रीय महासचिव भोला यादव यांनी पाटण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मागील सोमवारी लालूंनी पोलीस महानिरीक्षक (तुरुंग प्रशासन) यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावर सकारात्मक विचार करून लालूंना पॅरोल देण्यात आला आहे. आमच्या लाडक्या नेत्याला त्यांच्या पुत्राच्या लग्नात सहभागी होण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही, असे भोला यादव म्हणाले. चारा घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांमध्ये रांचीस्थित सीबीआय न्यायालयाने लालूंना कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांना तत्काळ अटक करण्यात आली होती.