Breaking News

शिवशाही रस्त्यावर धावण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला

सातारा, दि. 18, मे - फलटण आगााराला तीन शिवशाही आराम बस मिळुन चार महिने होऊन गेले. मात्र त्या बसेस रस्त्यावर धावल्या नसल्याने प्रवाशांच्या मनात शंका होती. शेवटी आज शिवशाही रस्त्यावर धावण्यासाठी सातारा विभागाला मुहूर्त सापडला आणि आ. दिपक चव्हाण व जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिवशाही बस दिमाखात प्रवाशांना घेऊन स्वारगेटकडे धावली.


सर्व सुविधांनी युक्त व आरामदायी प्रवास होणा-या शिवशाही बसेस राज्यात सर्वत्र धावत असताना फलटण आगारासाठी मिळालेल्या तीन गाड्या निंभोरे परिसरातील एका पेट्रोल पंपावर धुळ खात गेले चार महिने उभ्या होत्या. प्रवाशांना सतत वाटत होते की फलटण आगारातून शिवशाही कधी पुण्या - मुंबई कडे धावणार पण त्याचे समर्पक उत्तर कोणाही संबंधिताला देता आले नाही. ज्या खाजगी कंपनीने सदरच्या बसेस पुरविल्या आहेत ती कंपनी आणि फलटण आगार यांच्यामध्ये निश्‍चित प्रवासी भाडे करार प्रलंबित राहिल्याने सदरच्या बसेस चार महिने निंभोरे नजिक उभ्या होत्या. त्यामुळे बसेस मार्गावर धावल्या नाहीत. नियमित प्रवास करणा-या प्रवाशांना शिवशाही बसेस बाबत उत्सुकता व कुतुहल होतेच पण शेवटी आज मुहूर्त सापडला.