Breaking News

पोलीस कर्मचाऱ्याने दाखविली माणुसकी!

संगमनेर/प्रतिनिधी - आजकाल चोरीस गेलेला रुमालही पुन्हा परत मिळेल, याची कोणतीही शाश्वती नसताना येथील एका पोलीस कर्मचाऱ्याने एका व्यक्तीचे पैसे परत दिले. तालुक्यातील बसस्थानक परिसरात एका हॉटेलसमोर युवराज बाळू राठोड ( रा. सांगली, हल्ली घारगाव) यांचे पाच हजार रुपये बुधवारी सकाळी हरविले होते. याच दरम्यान घारगाव पोलिस ठाण्यातील वाहन चालक असलेले नामदेव गंगाधर बिरे (रा. दाढ खुर्द) हे पोलिस कर्मचारी या हॉटेलमध्ये पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यांना हॉटेलबाहेर पाचशे रुपयांच्या नोटा पडलेल्या आढळल्या. या नोटा त्यांनी ताब्यात घेत त्याची मोजणी केली असता ते पाच हजार रुपये होते. बिरे यांनी हॉटेलचालकाला पैसे सापडल्याची सुचना देत जर कोणी पैशाच्या शोधात आला तर त्याला पोलिस ठाण्यात पाठविण्यास सांगितले. पैसे हरविल्याने ते मिळण्याची आशा मावळलेले राठोड संध्याकाळी पुन्हा हॉटेलमध्ये आले असता त्यांनी सकाळी घडलेला किस्सा हॉटेल चालकाला सांगितला. हॉटेल चालकाने पैसे घारगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला सापडले असल्याचे सांगत पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. राठोड यांनी पोलिस ठाण्यात येऊन बिरे यांची भेट घेतली. बिरे यांनी ओळख पटवून राठोड यांना पैसे परत केले. चोरी गेलेले पैसे केवळ परत मिळाले नाहीत तर पोलिसातील माणुसकीचा अनुभवदेखील राठोड यांना यावेळी आला. राठोड यांनी प्रामाणिकपणे पैसे परत केल्याने घारगावचे निरीक्षक दिलीप निघोट, उपनिरीक्षक अन्सार इनामदार आणि मंगलसिंग परदेशी यांच्यासह संगमनेरचे पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात यांनी बिरे यांचे अभिनंदन केले.