Breaking News

शिंगणापूर देवस्थानने सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घ्यावा : येळवंडे

सोनई प्रतिनिधी - शिंगणापूर देवस्थानच्यावतीने शनिजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा समावेश आहे. यामध्ये राज्यातील नामांकित कीर्तनकारांचा समावेश आहे. अर्थात यासाठी कोणाचा विरोध अथवा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. मात्र हे करत असतांना या देवस्थानने शिर्डीच्या धर्तीवर सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर येळवंडे यांनी ‘दैनिक लोकमंथन’शी बोलतांना केली.

ते म्हणाले, सामान्य कुटुंबातील बापाला मुलीच्या लग्नाची प्रचंड धास्ती पडते. या चिंतेमुळे त्याच्यावर पार कोमात जाण्याची वेळ येते. मुलीच्या लग्नासाठी सावकाराकडून काढलेल्या कर्जाचे हप्ते फेडताना परिस्थिती विकोपाला गेल्याने त्याला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागतो. पैशांअभावी अनेक मुलींची लग्न लांबली आहे. अनेक मुलींना केवळ आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने इच्छा असतानाही शिक्षण अर्धवट सोडावे लागते. ग्रामीण भागांत पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक मुलींना नोकरी मिळत नाही. काहींना बिकट आर्थिक परिस्थितीमुळे अवघ्या चार ते साडेहजार रुपये पगारावर काम करावे लागते. शिक्षणाची वाट सोडून आज अनेक मुली ग्रामीण भागांत कांदा लागवड, ऊस तोडणी, कापूस लागवड आणि वेचण्याचे भर उन्हात काम करावे लागते. हे सर्व केवळ घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने होते. त्यात लग्नाच्या वयाची मुलगी ही बापाच्या जीवाला खूप मोठा घोर असतो. यामुळे त्याला धड झोप येत नाही, जेवण जात नाही. या सर्व परिस्थितीचा विचार करून शिंगणापूर देवस्थानने सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घेऊन गरीब आणि खचलेल्या बापाला दिलासा द्यावा.